प्लेलिस्ट – साज तरंग – हार्मोनियम

>>हर्षवर्धन दातार

इतिहासावर नजर टाकली तर गीतांचा प्रवास साथीला केवळ एक पेटी, तबला या मोजक्या वाद्यांपासून अनेक प्रकारच्या वाद्यांचा भव्य वाद्यमेळ असलेल्या गाण्यापर्यंत पोहोचला आहे. सुरुवातीला शब्द आणि भाव हे महत्त्वाचे घटक मानले जाताना बदल होत साथीला वाद्यांची भर पडत गेली. यात चित्रपट संगीताचा मुख्य बाज झाले ते म्हणजे हार्मोनियम ऊर्फ पेटी ऊर्फ बाजा किंवा संवादिनी.

गाणे म्हटले की त्यात शब्द, संगीत, गायकी आणि वाद्यमेळ अशा गोष्टी आल्या. गेल्या दोन भागांत आपण कमीत कमी वाद्यमेळ असलेल्या गाण्यांचा आढावा घेतला. इतिहासावर नजर टाकली तर गीतांचा प्रवास साथीला केवळ एक पेटी, तबला या मोजक्या वाद्यांपासून अनेक प्रकारच्या वाद्यांचा भव्य वाद्यमेळ असलेल्या गाण्यापर्यंत पोहोचला आहे. पन्नासच्या दशकापर्यंत शब्द आणि भाव हे महत्त्वाचे घटक मानले जायचे. साठच्या दशकामध्ये साथीला वाद्यांची भर पडत गेली आणि सत्तरच्या दशकामध्ये तर वाद्यमेळ बाजी मारून गेला होता. आधी हार्मोनियम (पेटी), तबला, ढोलकी, सतार, सारंगी, बासरी अशी साध्या प्रकृतीची वाद्यं वापरली जात. नंतर त्यात सॅक्सोफोन, बॉन्गो, कोन्गो, तुंबा, क्लॅरिनेट, ट्रम्पेट अशा पाश्चात्त्य वाद्यांची भर पडली. शेवटी ‘सब मर्जो की एकही दवा’ याप्रमाणे सगळ्या वाद्यांचे सूर आपल्या पोटात घेऊन सिंथेसायझर आला आणि इतर सर्व नैसर्गिक वाद्यांवर बेरोजगारीची वेळ आली. वाद्यवृंदात वाजणारी वाद्यं आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात.

युरोपातून हिंदुस्थानात आले आणि सुरुवातीच्या काळात हिंदुस्थानी संगीताचा, खास करून चित्रपट संगीताचा मुख्य बाज (बाजा) झाले ते म्हणजे हार्मोनियम ऊर्फ पेटी ऊर्फ बाजा किंवा संवादिनी. या बाजातून हवा बाहेर येते ती सूर होऊन. मजेशीर गोष्ट आहे. एकेकाळी आकाशवाणीने हार्मोनियमवर बंदी घातली होती. का? तर हे वाद्य परदेशी आहे म्हणून.

‘स्ट्रीट सिंगर’ (1938) सैगलच्या इच्छेनुसार ‘बाबुल मोरा नैहर छुट जाये’ या प्रसिद्ध गाण्याचे ध्वनिमुद्रण ते प्रत्यक्ष पेटी वाजवत गाताना झाले. स्वत सैगल उत्तम पेटीवादक होते. ते वाजवत असलेली पेटी आजही कलकत्ता संग्रहालयात आहे. ‘बाजार’मध्ये (1949) श्यामसुंदरच्या चालीवर शमशाद बेगम आणि सतीश बात्रा गात आहेत…‘छल्ला दे जा तेरी मेहेरबानी’. पडद्यावर पेटी वाजवताना दिसतो अभिनेता गोप. ‘बाबूल’ (1950) शकील-नौशाद या लोकप्रिय जोडीचं ‘हुस्नवालो को न दो दिल’ या गाण्याकरिता पेटीवादक दिलीप कुमारला आवाज दिला आहे तलत मेहमूदनी. गाण्यांकरिता गाजलेल्या ‘अलबेला’मध्ये (1951) भगवान दादावर एक हलकं फुलकं गाणं ‘हसीनो से मुहब्बत का अंजाम बुरा होता है’. इथे पेटी त्यांच्या साथीदाराकडे आहे. ‘दीदार’मध्ये (1951) ‘हुए हम जिनके लिये बदनाम’ हे अतिशय गाजलेले गाणे. आवाज रफीचा आणि पडद्यावर पुन्हा एकदा पेटीवादक दिलीप कुमार. सोहराब मोदी दिग्दर्शित ‘कुंदन’मध्ये (1955) चरित्र अभिनेता ओमप्रकाश -मनोरमावर चित्रित सुधा मल्होत्रा-एस. डी. बातीशनी गायलेले ‘आओ हमारे होटल मे’ हे गमतीदार युगुल गाणे. गळ्यात पेटी घेतलेल्या ओमप्रकाशच्या विशिष्ट लकबी लक्षवेधक. मुख्य म्हणजे गंभीर प्रकृतीची गाणे लिहिणारे शकील बदायुनी गीतकार आहेत.

1956च्या क्राइम थ्रिलर ‘सीआयडी’मध्ये चौपाटीवर देव आनंद शकिलाचा पाठलाग करतो आणि साथीला शीला वाझ आणि एक पेटीवादक गात आहेत…‘लेके पहला पहला प्यार’ हे रफी-शमशाद बेगमच्या आवाजातले गाणे. ‘काला पानी’मध्ये (1958) रफी-आशा यांच्या आवाजात ‘ओ दिलवाले अब तेरी गली तक आ पहुंचे’ या गाण्यात देव आनंद पेटी वाजवतो. हा चित्रपट ए. जे. ाढाsनिन यांच्या ‘बियांड धिस प्लेस’ या कादंबरीवर आधारित होता. ‘पोस्ट बॉक्स 999’ (1958) या आणखी एका ाढाईम थ्रिलरमध्ये मोगल सराय या त्या काळच्या सर्वात मोठय़ा रेल्वे जंक्शनवर चित्रित गाणं ‘बिछडे हुए मिलेंगे दिल’ पडद्यावर स्टेशनवरच नाचगाणं बघत आहेत सुनील दत्त, शकिला आणि हरवलेल्या मुलाला शोधणारी लीला चिटणीस. संगीतकार नंतर प्रसिद्ध झालेल्या कल्याणजी-आनंदजी जोडीतले कल्याणजी वीरजी शहा. चित्रपटाची मूळ प्रेरणा हेन्री हाथवेची ‘कॉल नॉर्थसाईड 777’ ही कादंबरी.

आणखी एक स्ट्रीट सॉंग ‘दिल अपना प्रीत पराई’ (1960) चित्रपटातलं ‘जाने कहां गयी’ हे शंकर-जयकिशनचं संगीत. आवाज रफी आणि पडद्यावर गिटार वाजवणारा राज किशोर आणि पेटीवर शीला वाझ. या गाण्यातून आपली व्यथा शोधतोय राज कुमार. ‘बरसात की रात’ (1960) यातील साहिर-रोशन यांची 12 मिनिटांची सर्वश्रेष्ठ प्रसिद्ध कव्वाली ‘ना तो कारवां की तलाश है’ मन्ना डे, आशा भोसले, सुधा मल्होत्रा, एस. डी. बातीश आणि रफी अशा गायकांची मांदियाळी. मध्येच नायक भारतभूषण पेटीचा ताबा घेतात आणि रेडिओवर ऐकत आहे मधुबाला. तात्त्विक चिंतन, धर्मनिरपेक्षता हे साहिर विशेष विषय यात आहेत. ‘एक मुसाफिर एक हसीना’ (1962) यात अतिशय लोकप्रिय असं ढोलकी-विशेष ठेका असलेलं ‘बहोत शुािढया बडी मेहेरबानी’ हे ओ. पी. नय्यर आणि रफी-आशाचं गाजलेलं गाणं. जॉय मुखर्जी पेटीवर साधनाच्या स्तुतीपर हे गाणं म्हणतो. पेटीचे सूर अत्यंत ठळकपणे ऐकू येतात. ‘मेरे लाल’ (1964) चित्रपटातलं ‘पायल की झंकार रस्ते रस्ते’ हे मजरूह-लक्ष्मीकांत प्यारेलाल-लताजी यांचं त्या काळातलं एक विविध भारती विशेष गाणं. प्रसंग तोच… रस्त्यावरील बघ्यांच्या गर्दीसमोर नाचगाण्याचा. पडद्यावर नायिका इंद्राणी मुखर्जी (पुढे चरित्र भूमिकेत विशेष करून आईच्या भूमिकेत दिसली) संगीताचा बाज हा ढोलक आणि एल.पी. खासीयत आहे.

‘पडोसन’मधलं (1968) धुवांधार लोकप्रिय ‘एक चतुर नार’ या गाण्याला या प्रकारात महत्त्वपूर्ण स्थान आहे. मेहमूद, किशोर कुमार, सुनील दत्त आणि त्यांचे सहकारी पडद्यावर आणि गायनात स्वत किशोर कुमार, मन्नाडे यांची जुगलबंदी या सर्वांनी आर. डी. बर्मनच्या संगीतावर अक्षरश धुमाकूळ घातला आहे. पेटी मात्र सुराला धरून चालण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱया मेहमूदकडे आहे. ‘दस लाख’ (1966) चित्रपटात संगीतकार रवी यांचे आणि रफी-आशा यांनी गायलेले ‘गरीबो की सुनो’ या लोकप्रिय गाण्याला फिल्मफेअर पारितोषिक मिळाले होते. पडद्यावर पेटी वाजवताना संजय खान आणि बबिता. ‘जंजीर’ (1974) यातलं ‘दिवाने है दिवानो को ना घर चाहिये’ (पडद्यावर पेटीवादक स्वत गीतकार गुलशन मेहता-बावरा आहेत), ‘मुकद्दर का सिकंदर’मधलं अभिनेत्री रेखावर चित्रित प्रसिद्ध मुजरा गीत ‘सलामे इश्क मेरी जान’ बसमध्ये चित्रित ‘अपनापन’ (1977) यातील ‘आदमी मुसाफिर है’ (पडद्यावर सुधीर दळवी-निवेदिता जोशी हे मराठी कलाकार), 1977च्याच ‘स्वामी’मधील ‘का करू सजनी’ हे येसुदास-राजेश रोशन जोडीचं भावपूर्ण विरहगीत, ‘दिल के टुकडे टुकडे करके’ (‘दादा’-1978) ही या यादीतली आणखी काही ठळक गाणी. नवीन गाण्यात ‘होशवालो को खबर क्या’ (‘सरफरोश’…1998) ही जगजीत सिंग यांच्या मखमली आवाजात निदा फाजली यांची गजल. पडद्यावर पेटीवर नासिरुद्दीन शाह आणि रिक्षावाल्यांमध्ये लोकप्रिय ‘राजा हिंदुस्थानी’ (1996) यातलं ‘परदेसी परदेसी जाना नही’. बहुतेक सर्व संगीतकार हे उत्तम पेटीवादक आहेत. गोविंदराव पटवर्धन, आप्पा जळगावकर पुरुषोत्तम वालावलकर हे काही जुनेजाणते नावाजलेले पेटीवादक. तसेच ज्यांना प्रत्यक्ष आशा भोसलेंनी आर. डी. बर्मन यांचा हार्मोनियम सुपूर्द केला असे आजकालचे नामवंत सचिन जांभेकर. चाली बांधण्याकरिता हार्मोनियम हे उपयुक्त साधन असल्यामुळे सुरुवातीपासून संगीतकार चाली बांधण्याकरिता पेटीचा वापर करतात. संगीतकारांची ओळख पेटीवाला किंवा बाजेवाला अशीच होती. पडद्यावरचे हे प्रसंग बघितले तर आपल्या असे लक्षात येईल की, चित्रपटातली पेटीवरची बहुतेक गाणी ही रस्त्यावरच्या नाचगाणी करून पैसे मिळवणाऱया भूमिकांवर चित्रित आहेत.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)