वरिष्ठांचा जाच; पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडली

वरिष्ठ अधिकाऱयांच्या जाचाला कंटाळून सोलापुरात पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास घरामध्ये रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली असून, कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांवर गंभीर आरोप केले आहेत. आनंद मळाळे हे सध्या नांदेड येथे कार्यरत होते. दरम्यान, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच पोलीस दलातही सगळे काही आलबेल नसल्याचे या घटनेनंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे.

 

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे हे अंतर्गत परीक्षा पास करून पोलीस निरीक्षक झाले होते. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत असताना पदोन्नतीने त्यांची नांदेड येथे पोलीस निरीक्षकपदी बदली झाली होती. सध्या ते आजारी रजेवर आले होते. सोलापुरात कुटुंबासोबत राहात होते. आज पहाटे त्यांनी घरातच रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आनंद मळाळे यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये बिलोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना वरिष्ठ अधिकाऱयांकडून त्रास सुरू झाला. गुह्याच्या तपासात मदत न करणे, मुदतीत दोषारोपपत्र पाठविणे आवश्यक असणारे गुन्हे तपासाला देणे, कारणे दाखवा नोटीस बजावणे आदी त्रास दिला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. आनंद मळाळे यांच्या मागे आई, पत्नी, मुले असा परिवार आहे.

चिमू, माझ्या खिशात चिठ्ठी आहे. व्हॉट्सऍप मेसेजमधून मोठा खुलासा

– सोलापुरात पहाटे स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांच्या आत्महत्येचा खुलासा त्यांनी पत्नीला मोबाईलवर व्हॉट्स ऍपवरून पाठविलेल्या मेसेजवरून झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या त्रासामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असा आरोप करीत त्यांच्या कुटुंबीयांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मळाळे यांनी पत्नीला पाठवलेला मेसेज नातेवाईकांनी व्हायरल केला आहे.

दरम्यान, चिठ्ठीतील मजकूर इंग्रजी व मराठीतून असून, खाडाखोड झाल्याने ताळमेळ लागत नाही. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबला ही चिट्ठी पाठवून मजकुराची खातरजमा केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.