भरधाव पिकअपची ट्रकला पाठीमागून धडक एक ठार; कवठे महांकाळ येथील घटना

पंढरपूरवरून मिरजेकडे निघालेल्या ट्रकला पाठीमागून पिकअपने धडक दिली. यामध्ये पिकअपचालक जागीच ठार झाला. ही घटना आज (रविवारी) पहाटे रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावरील कुची ते लांडगेवाडी (ता. कवठे महांकाळ) या दरम्यान झाला. या अपघाताची नोंद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे. सूर्यकांत अन्नराया नंदुर (रा. कलबुर्गी, कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे.

सूर्यकांत नंदुर हे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पिकअपने रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावरून सांगलीकडे जात होते. त्याचवेळी एक ट्रक कुची ते लांडगेवाडी दरम्यान जात असताना पिकअपने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, पिकअप पूर्णपणे ट्रकच्या पाठीमागील बाजूच्या टायरपर्यंत घुसला होता. या घटनेची माहिती कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात समजल्यानंतर, तातडीने कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील आनंदराव जाधव, देवानंद बोबडे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. भरधाव वेगाने जात असलेल्या पिकअपचे चालक सूर्यकांत नंदुर यांना डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. या घटनेची नोंद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.