राहुल द्रविडच राहणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक; सपोर्ट स्टाफच्याही करारात वाढ

विश्वचषकाचे सामने संपल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण असणार याबाबत चर्चा सुरू होती. मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांचा करार संपत असल्याने नव्या प्रशिक्षकाची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यात अनेक नावे आघाडीवर होती. आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकपदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले राहुल द्रविडच या पदावर कायम राहणार आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह सहयोगी स्टाफच्या करारतही वाढ करण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

यंदाच्या विश्वचषक सामन्यानंतर राहुल द्रविडसोबतचा मुख्य प्रशिक्षकपदाचा करार संपला होता. त्यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत राहुल यांचा कार्यकाळ वाढवण्यावर एकमत झाले. बीसीसीआयने राहुल द्रविड यांचे आणि त्यांच्या कार्यकाळात संघाने दाखवलेल्या कामगिरीचे कोतुक केले. तसेच एनसीए प्रमुख वीवीएस लक्ष्मण यांचेही कौतुक केले.

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बेन्नी यांनी सांगितले की, राहुल द्रविड यांची दूरदृष्टी आणि प्रयत्नांमुळे टीम इंडियाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना आव्हाने स्वीकारली आणि त्यावर मात करत संघाला यश मिळवून दिले, याबाबत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. टीम इंडियाचे यश हे त्यांचे योगदान, मार्दगर्शन आणि प्रयत्न यांचे फलित आहे. त्यामुळे त्यांचा करार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल द्रविड यांनीही या पदावर कायम राहण्यास सहमती दर्शवल्याने आम्हाला आनंद झाला आहे, असे बेन्नी म्हणाले.