सामाजिक बदलाचे पाऊल,100 वर्षांनी होणाऱ्या विधवा महिला परिषदेत सहभागी व्हा; प्रा.डी. एस. लहाने यांचे आवाहन

विधवा महिलांना सन्मानजनक वागणूक मिळावी, विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळावे व त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होता यावे, यासाठी बुलढाण्यात विधवा महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले यांच्या नंतर 100 वर्षानी होणारी विधवा परिषद ऐतिहासिक आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. डी. एस. लहाने यांनी पत्रकार परिषदेत केले.

बुलढाणा येथील तुलसी नगर येथे विधवा महिला परिषदेचे आयोजन 10 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. याचे जय्यत नियोजन शिवशाही परिवार व मानस फाउंडेशन द्वारा करण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी परिषदेचे आयोजक प्रा. डी. एस. लहाने, पत्रकार गणेश निकम केळवदकर, प्रा. शाहिना पठाण, प्रतिभा भुतेकर, प्राचार्य ज्योती पाटील, अश्विनी सोनवणे आदींनी भूमिका मांडली.

प्राध्यापक डी. एस. लहाने म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिला विधवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विधवा महिलांच्या जीवनात अनंत अडचणी असतात. सहजीवनाचा साथी सोडून गेल्यानंतर समाज ही त्या महिलेला वार्‍यावर सोडतो. तिच्यावर अनेक बंधने लादली जातात. तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोनही बदलतो. शुभकार्यात मुद्दाम अशा स्त्रीला मागे ठेवले जाते. महिला तशाही आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर नसतात. त्यासाठी त्यांना कुटूंबावर अवलंबून रहावे लागते. एकीकडे आर्थिक अडचणी तर दुसरकीडे सामाजिक कुचंबना असताना विधवा पुनर्विवाहाचा विचार कोणाच्या मनीमानसीही येत नाही. या सर्व समस्यांचा विचार करून ‘शिवसाई परिवार व मानस फाऊंडेशन’ द्वारा विधवा परित्यक्त महिला परिषदेचे आयोजन बुलडाणा नगरीत करण्यात येत असल्याचे प्रा.लहाने म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित राहणार आहे.

पालकांनी पुढाकार घ्यावा – शाहिना पठाण
सामाजिक बदल सहजासहजी होत नाही. त्यासाठी डोळस लोकांनी पुढे आले पाहिजे. विशेषतः ज्याची मुलगी विधवा आहे अशा पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या शाहिना पठाण यांनी केले. पत्रकार गणेश निकम यांनी आयोजन बद्दल माहिती दिली तर प्राचार्य ज्योती पाटील, अश्विनी सोनोने यांनी परिषदेची भूमिका मांडली.

परिषदेचा उद्देश 
विधवा महिलांना आर्थिक आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न , शासनस्तरावर विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, विधवांचा सामाजिक, मानसिक, आर्थीकस्तर उंचावण्याचा प्रयत्न करणे विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहान मिळावे, हे परिषदेचे उद्देश्य आहेत.