जिथे कंडक्टर म्हणून काम केलं होतं, त्याच बसडेपोला रजनीकांत यांनी दिली भेट

माणसाचे हात कितीही आकाशात असतील तर त्याचे पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले असायला हवेत, असं नेहमी म्हटलं जातं. आज आपली परिस्थिती कालपेक्षा उत्तम असेल तरीही माणसाने आपल्या उमेदवारीच्या काळाला कधी विसरायचं नसतं. ही उक्ती सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे. आज कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या रजनीकांत यांनी आपल्या उमेदवारीच्या दिवसांच्या आठवणी जागवण्यासाठी थेट त्याच बसडेपोत भेट दिली, जिथे ते कधीकाळी कंडक्टर म्हणून काम करत होते.

मंगळवारी सकाळी रजनीकांत यांनी अचानक बेंगळुरू येथील मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या डेपोत भेट दिली. तिथे त्यांना पाहून सर्वांना आश्चर्य आणि आनंदाचा धक्का बसला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना घेराव टाकला आणि मग फोटो, गप्पा यांना सुरुवात झाली. काहींनी त्यांच्या पायाही पडायला सुरुवात केली.

अनेक महागड्या गाड्यांचा ताफा दाराशी असताना रजनीकांत यांनी बसडेपोत येण्याचं कारण आधी लोकांना कळलं नाही. मग मात्र त्याचा उलगडा झाला. वास्तविक अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रजनीकांत हे बस कंडक्टर म्हणून काम करायचे. ते याच बसडेपोत काम करत असत. आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणी जागवण्यासाठी रजनीकांत यांनी बसडेपोला अचानक भेट दिली.

दरम्यान, रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता 19 दिवस उलटले आहेत आणि चित्रपटाने कमाईचे सगळे विक्रम मोडले आहेत. आतापर्यंत सुमारे 600 कोटी इतकी कमाई रजनीकांत यांच्या जेलरने केली आहे