श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत भाविकांची अलोट गर्दी, गोपाळकाला, कृष्णावेणीमाता उत्सवानिमित्त हजारो भाविक दाखल

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आज भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. माघी पौर्णिमा, गोपाळकाला यांसह गेल्या 10 दिवसांपासून ‘कृष्णावेणीमाता उत्सव’ सुरू असून, उद्या (25 रोजी) शेवटचा दिवस असल्याने कृष्णामातेची ओटी भरण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.

महाराष्ट्रसह गोवा, कर्नाटक आदी राज्यांतून अनेक भाविक श्री दत्तांच्या दर्शनासाठी आले होते. माघी पौर्णिमा व दत्त गोपाळकाला उत्सवानिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी येथील दत्त मंदिरात हजेरी लावण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या गावांतून अनेक भाविक पहाटेच चालत आले होते. माघी स्नानसमाप्तीनिमित्त भाविकांनी दत्तदर्शन व स्नानाचा लाभ घेतला. मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचारपूजा, सकाळी आठ वाजल्यापासून पंचामृत अभिषेक, सायंकाळी सात वाजता पवमान पंचसूक्तांचे पठण, श्री दत्त गोपाळकाला उत्सव असल्याने मध्यरात्री बारा वाजता महापूजा, पहाटे दोन वाजता धूप, आरती व पालखी सोहळा संपन्न झाला.

यावेळी दत्त देव संस्थानमार्फत कापडी मांडव, दर्शनरांग, मुखदर्शन, स्वयंसेवक, सुरक्षारक्षक, ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी व्यवस्था केली होती. तसेच महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतल्याचे दत्त देव संस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी व सचिव संजय ऊर्फ सोनू पुजारी यांनी सांगितले.

गर्दीचे नियोजन करण्यासाठी दत्त देव संस्थानचे कर्मचारी, नदीकाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. दरम्यान, चौथा शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्टी असल्याने नृसिंहवाडीत फुल्ल गर्दी झाली होती. सुट्टी व पौर्णिमेमुळे गर्दी वाढल्याने बहुमजली पार्ंकग फुल्ल होऊन भाविकांनी जागा मिळेल तेथे दुचाकी पार्क केल्या. तसेच कुरुंदवाड-शिरोळ रस्त्यावर दुतर्फा चारचाकी गाडय़ा लावाव्या लागल्या.

गुरुवारपर्यंत मंदिर 24 तास खुले

श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देव संस्थानमार्फत शुक्रवार(दि. 23)पासून श्री दत्त गोपाळकाला उत्सवास सुरुवात झाली आहे. औदुंबर पंचमी अर्थात गुरुवार(दि. 29)अखेर सात दिवस उत्सव साजरा होत असून, याला ‘जागरणाचा उत्सव’
म्हणून महत्त्व आहे. या काळात दर्शनासाठी दत्त मंदिर सातही दिवस भक्तांना 24 तास खुले असते.