आज ‘अदानी’वर धडक! धारावीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईतील उद्योग-रोजगाराचे प्रमुख केंद्र असलेली धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दीड लाखाचा प्रचंड महामोर्चा उद्या ‘बीकेसी’तील ‘अदानी’च्या कार्यालयावर धडकणार आहे. धारावीकरांच्या रक्षणासाठी शिवसेनेने उभारलेल्या लढय़ाला सर्वपक्षीयांनी बिनशर्त पाठिंबा दिला असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह 15 हून अधिक पक्ष, संघटना, संस्था या महामोर्चात सहभागी होणार आहेत. धारावी टी-जंक्शन येथून दुपारी 3 वाजता हा मोर्चा निघणार असून कलानगरमार्गे पुढे जाऊन ‘बीकेसी’तील अदानीच्या कार्यालयावर धडकणार आहे.

स्थळ धारावी – टी जंक्शन ते बीकेसी अदानी कार्यालय, वेळ दुपारी 3 वाजता

आशिया खंडातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी  पुनर्विकासाच्या नावाखाली ‘टीडीआर’ घोटाळा करून ‘अदानी’च्या घशात घालण्याचा  डाव ‘मिंधे’ सरकारने आखला आहे. यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्पेशल प्रोजेक्ट जाहीर करूनही धारावीकरांना फक्त 300 फुटांची जागा देण्याचा घाट घातला असून विकासक ‘अदानी’वर मात्र सवलतींचा वर्षाव केला आहे. दरम्यान, हरकती-सूचना न मागवता सरकारने थेट विकासाची हमी घेतल्याने धारावीकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याला वाचा पह्डण्यासाठी शिवसेना अदानीवर धडक देणार आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी ‘धारावी बचाव आंदोलन’च्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ, पर्ह्ट येथे पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची माहिती देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि ‘धारावी बचाव आंदोलन’चे बाबूराव माने, विभाग संघटक विठ्ठल पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उल्लेश गजाकोश, भाकपचे नितीन रानडे, ‘आप’चे संदीप कटके, धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक आणि शेकापचे अॅड. राजेंद्र कोरडे, संजय भालेराव, ‘माकप’चे शैलेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

असे आहे धारावीचे महत्त्व

धारावीत तब्बल पाच हजार उद्योग, 15 हजार छोटय़ा-मोठय़ा फॅक्टरीज, अडीच लाख लोकांना रोजगार देणारी आणि देशविदेशातील अनेक उद्योगांना कच्च्या मालासह तयार वस्तू पुरवणारी मुंबईचे आर्थिक केंद्र आणि मुंबईला आर्थिक पाठबळ देणारे इंधनच आहे.

जय्यत तयारी, प्रचंड उत्साह

मिंधे सरकार धारावी ‘अदानी’च्या घशात घालण्याचे कारस्थान करीत असताना शिवसेना धारावीकरांच्या न्याय्य हक्कासाठी ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळे धारावीकरांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. चौकाचौकत 300 हून जास्त सभा घेण्यात आल्या असून मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. धारावी टी-जंक्शन ते ‘बीकेसी’पर्यंतच्या मोर्चाच्या मार्गावर लक्षवेधक बॅनर्स लावण्यात आले आहेत.

500 चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे

निवासी झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचे घर मोफत द्या अशी प्रमुख मागणी धारावीकरांची आहे. तर पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचे घर मोफत द्यावे, शाहूनगर लेबर पॅम्पमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांची जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन हवे

धारावीत केवळ आठ हजार झोपडय़ांचे सर्वेक्षण झाले असून 80 ते 90 हजार झोपडीधारक पात्र-अपात्रतेच्या सीमेवर आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहणाऱया भूमिपुत्र हजारो धारावीकरांना या ठिकाणाहून हुसकावण्याचा डाव आहे का, असा सवाल शिवसेनेने केला आहे. यासाठी धारावीतील सर्व निवासी, अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा अशी मागणीही करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या दुसऱया टीझरलाही तुफान प्रतिसाद

धारावीत ठिकठिकाणी शेकडो चौकसभा सुरू असून त्याच्या जोडीला उद्या होणाऱया मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने दुसरा टीझर व्हायरल केला आहे. टीझरमध्ये रजनीकांतच्या ‘काला’ चित्रपटाची पार्श्वभूमी मांडली आहे. रजनीकांत धारावीकरांच्या रूपाने बोलतो आहे, असे दाखवत ‘जमीन हमारा हक है’ असा दम समोर उभ्या असलेल्या अदानीरूपी खलनायकी प्रवृत्तीला दिला आहे. ‘धारावी धारावीकरांचीच, मुंबईकरांच्या हक्काची!’, ‘धारावी नाही कुणाच्या बापाची, धारावी धारावीकरांचीच’, ‘धारावीकरांच्या न्यायासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी’ अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. ‘अदानी विरुद्ध विराट मोर्चा,’चा टीझर तुफान व्हायरल होत आहे.

परदेशी बाजारपेठाही धारावीवर अवलंबून

दरवर्षी जवळपास 5400 ते 8300 कोटींची उलाढाल धारावीतून होते. त्यामुळे परदेशातील अनेक बाजारपेठाही धारावीवर अवलंबून आहेत. यामध्ये चामडय़ाच्या वस्तू, दागिने, विविध उपकरणे, कापड इत्यादी गोष्टी धारावीतून जगभरात निर्यात केल्या जातात. अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये अनेक बाजारपेठा प्रामुख्याने धारावीतील उत्पादनावर चालतात.

अदानी सरकारचा जावई आहे का?

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानींना  विकास शुल्क, छाननी शुल्क, आयकर, मुद्रांक शुल्क आणि पालिकेच्या विविध शुल्कांमध्ये सूट दिली आहे. त्यांच्यावर एवढी मेहरबानी का? अदानी सरकारचा जावई आहे का, असा सवाल शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत केला.

अदानी यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून साडेतीन लाख कोटींचा टीडीआर मिळणार आहे. हा टीडीआर अदानी संपूर्ण शहराला विकणार आहेत.  विकासकांना 50 टक्के टीडीआर अदानीकडून विकत घ्यावा  लागेल. अदानींना चार एफएसआय दिला आहे. यातून त्यांना किती फायदा होणार व प्रत्यक्षात सरकारला किती फायदा होणार याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी असे ते म्हणाले.

हे पक्ष, संघटना सहभागी होणार

धारावी बचाव मोर्चात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन पार्टी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), शेतकरी कामगार पक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्युलर), आझाद समाज पार्टी, सर्व समाज जनता पार्टी, धारावी भाडेकरू महासंघ आणि धारावीत सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, चाळ कमिटय़ा, संस्था, संघटना, मंडळे सहभागी होणार आहेत.

धारावीची जागा अडाणीला पुढे करून गिळंकृत करायची आहे. मॅन्ग्रोची जमीन बुजवून त्यांचा आता सपाटीकरण करण्याचा घाट आहे- श्रीनिवासन राजू (स्थानिक)

सरकारने अजून आम्हाला विश्वासात घेतलेले नाही, अजून सर्वे झालेला नाही, कोण अदानी? आम्हाला माहीतही नाही.  z वेणी सुंदर (गृहिणी)

लाखो परिवाराना उध्वस्त करून, मुंबईकरांच्या आत्म्यावर घाव घालणारा जर हा प्रकल्प असेल, जर पर्यावरणाचे स्वास्थ बिघडविणारा हा प्रकल्प असेल, तर त्याला मान्यता देणे म्हणजे मुंबईकरांवर अन्याय करण्यासारखे होईल- तानाजी घाग (घनकचरा संकलक)

धारावीकरांना आहे त्याच ठिकाणी उद्योगासह घर-जागा मिळाली पाहिजे. विकासक मित्रांच्या भल्यासाठी मुंबईकडे वाकडय़ा नजरेने पहाल तर याद राखा! -उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

बीडीडी चाळींचा पुनर्विकास महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून होतोय, तसा धारावीचा पुनर्विकास मिंधे सरकार का करत नाही? या प्रकल्पात केवळ सरकारचा पिंवा कुणाच्या तरी मित्राचा विकास होऊ नये- आदित्य ठाकरे

धारावी पुनर्विकास प्रकल्पातून अदानी यांना एक लाख कोटींचा फायदा होणार असून पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्या संगनमताने हा घोटाळा होणार आहे. हा प्रकल्प म्हणजे धारावीकरांची आणि मुंबईकरांची मेगालूट आहे- वर्षा गायकवाड

मोर्चाची प्रमुख कारणे

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा ‘टीडीआर’ मुंबईत कुठेही वापरण्याची मुभा ‘अदानी’ला दिल्यामुळे इतर विकासकांना पहिल्यांदा ‘टीडीआर’ वापरायचा असेल तर तो अदानीकडून घ्यावा लागणार आहे.

‘टीडीआर’ घोटाळा करून मुंबई ‘अदानी’च्या घशात घालण्याचा ‘मिंधे’ सरकारचा डाव आहे.

धारावीत आतापर्यंत केवळ 58 हजार झोपडय़ांचे सर्वेक्षण झाले असून 80 ते 90 हजार झोपडीधारक अजूनही पात्र-अपात्रतेच्या सीमेवर आहेत. त्यामुळे हजारो भूमिपुत्र रस्त्यावर येण्याची भीती.

निवासी झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचे घर, तर पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचे घर मिळावे.

‘बीडीडी’च्या धर्तीवर पुनर्विकास करा

‘अदानी’ हा विश्वासार्ह विकासक नसल्याची जनभावना असल्याने  म्हाडा, सिडको अशा सक्षम प्राधिकरणाकडून ‘बीडीडी’च्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात यावा.

नव्याने सर्वेक्षण करून यादी जाहीर करावी. निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करावा,  ‘टीडीआर’साठी सरकारने स्वतःची पंपनी नेमण्याची मागणीही आहे.

प्रकल्पाचे स्वरूप झोपडीधारकांना समजण्यासाठी मास्टर प्लान आधी जाहीर करून धारावीकरांना पुनर्विकासाबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.