जागतिक पोलीस गेम्स – महाराष्ट्र पोलिसांचा तिहेरी सुवर्ण धमाका; विजय चौधरी, नरसिंग यादव आणि राहुल आवारेची सोनेरी कामगिरी

महाराष्ट्राच्या पोलीस दलातील स्टार कुस्तीपटूंनी सोनेरी कामगिरी करत देशाला कडक सॅल्यूट केले. ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी आणि नरसिंग यादवसह राहुल आवारेने आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवत कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलीस अॅण्ड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात हिंदुस्थानसाठी तिहेरी सोनेरी धमाका केला. एकाच स्पर्धेत महाराष्ट्राच्या पोलिसांनी सुवर्णपदकासह जगज्जेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

लाल मातीत दम घुमवणाऱया विजय चौधरीने सर्वांपेक्षा आगळी कामगिरी करताना मातीतल्या कामगिरीचे मॅटवर सोने करण्याचा पराक्रम केला. त्याने 125 किलो वजनाच्या हेविवेट गटात कॅनडाच्या गतविजेत्या आणि संभाव्य विजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत हिंदुस्थानचे सुवर्ण निश्चित केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरीने उपांत्य फेरीत साहोताशी लढत दिली. त्याने अटीतटीच्या सामन्यात साहोताचा 11-08 अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या विजयानंतरच विजयचे जगज्जेतेपद निश्चित झाले होते. अंतिम सामन्यात त्याने अमेरिकेच्या जे. हेलिंगरवर 10 गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-01 ने जिंकत हिंदुस्थानला सुवर्णपदक मिळवून दिले. जागतिक पोलीस अॅण्ड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते.

जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बागली या गावचा विजय चौधरी हा महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. याशिवाय तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेतेपद, तसेच अनेक मानाच्या कुस्त्यांमध्ये बाजी आणि राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरीने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

चौधरीला काही महिन्यांपासून प्रशिक्षक ‘हिंद केसरी’ रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण देत होते. महाराष्ट्रातील एक नामांकित आणि प्रतिष्ठत कुस्तीपटू विजय चौधरी आता जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून हिंदुस्थानचा नवीन ‘रेसलिंग सेनसेशनल’ बनला आहे.

माझा विजय हिंदुस्थानी पोलिसांना अर्पण – विजय चौधरी

‘काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की मला जागतिक पोलीस खेळांमध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत हिंदुस्थानसाठी सुवर्ण पदक जिंकून हिंदुस्थानी कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद झाल्याची प्रतिक्रिया जगज्जेत्या विजय चौधरीने विजयानंतर व्यक्त केली. ‘महाराष्ट्र राज्य पोलीस विभागातील माझ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला.’ मी हा विजय हिंदुस्थानातील प्रत्येक पोलीस अधिकाऱयाला समर्पित करतो जो देशाला प्रथम स्थान देऊन समाजाची 24 तास सेवा करत असतो. हे सुवर्णपदक मी संपूर्ण हिंदुस्थानी पोलीस दलाला समर्पित करत असल्याचेही चौधरीने अभिमानाने सांगितले.

महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो

चौधरीप्रमाणे मुंबईकर नरसिंग यादवही ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’ आहे आणि तोसुद्धा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. त्यानेही आपल्या मॅटवरील जोरदार कामगिरीची पुनरावृत्ती करताना 74 किलो वजनी गटात सुवर्ण पदक संपादले. तसेच राहुल आवारेने 61 किलो वजनी गटात सोनेरी यश मिळविले.