माथेफिरू तरुणाने प्रेयसीच्या आई, भावाला जिवंत जाळले

अमरावतीमध्ये एका माथेफिरू तरुणाने प्रेयसीची आई आणि भावाला जिवंत जाळल्याची घटना रविवारी रात्री घडली. या तरुणाने नंतर स्वःही पेटवून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघे एकत्र राहत होते. मात्र, सातत्याने वादावादी होऊ लागल्यामुळे मुलीने पुन्हा आई आणि भावासोबत राहण्यास सुरुवात केली होती.

अमरावतीमधील वरुड तालुक्यातील वंडली येथे ही थरारक घटना घडली. आशीष ठाकरे (25) असे आरोपी तरुणाचे नाव असून लता सुरेशराव भोंडे (45) आणि त्यांचा मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (20) अशी जाळून हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून आशीष आणि संबंधित तरुणी एकत्र राहत होते. त्यांचे प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. मात्र, काही काळाने दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यामुळे तरुणीने आशीषसोबतचे संबंध तोडले आणि ती पुन्हा आई आणि भावासोबत राहू लागली होती.

आशीषचे तरुणीच्या आई व भावासोबत झाले होते भांडण
प्रियकराशी भांडण झाल्यामुळे तरुणी आई आणि भावासोबत राहत होती. परंतु, तिला घेऊन जाण्यासाठी आशीष सातत्याने तिच्या घरी जात होता. तरुणीची आई आणि भाऊ मात्र पुन्हा तिला आशीषसोबत पाठवण्यास तयार नव्हते. यादरम्यान, तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबतही आशीषचे कडाक्याचे भांडण झाले. याचा राग मनात ठेवून या तरुणाने आई आणि भावाला पेटवून संपवल्याचे समोर येत आहे. प्रेयसी घरी नसताना आशीष तरुणीच्या घरी गेला आणि त्याने तिच्या आईला तसेच भावाला जिवंत जाळले. त्यानंतर घाबरलेल्या आशीषने स्वतःही जाळून घेतले. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.