‘ज्याचा त्याचा प्रश्न’ने मारली बाजी

गिरगावात रंगलेल्या 62 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून ग्रामीण समाज प्रबोधिनी संस्थेच्या ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तसेच बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ, मुंबई या संस्थेच्या ‘मॅकबेथ’ नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सहप्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई मनपा, मुंबई या संस्थेच्या ‘फ्लाईंग राणी’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विजेत्या संघाची नावे घोषित केली.  20 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे स्पर्धा रंगली. स्पर्धेत एकूण 17 नाटय़प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. समीर मोने, विनोद दुर्गापुरे आणि सुजाता गोडसे यांनी काम पाहिले,  तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर यांनी काम पाहिले.

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक वनमाला वेंदे (नाटक -‘ज्याचा त्याचा प्रश्न’), द्वितीय पारितोषिक प्रसिद्धी राजेश (नाटक –
‘मॅकबेथ’). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सौरभ येसवारे (नाटक – ‘खटला’) व वनमाला वेंदे (नाटक – ‘ज्याचा त्याचा प्रश्न’).