अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ला विरोध; इतिहासाशी छेडछाड नको म्हणत लोक रस्त्यावर उतरले

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ हा ऐतिहासिक चित्रपट आगामी वर्षात प्रदर्शित होणार आहे. लोकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता असतानाच काहींनी याला विरोधही सुरू केला आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतर अक्षय कुमार याचा लूक काही लोकांना आवडलेला नाही. याविरोधात लोक रस्त्यावर उतरले असून इतिहासाशी छेडछाड न करण्याचा इशारा दिला आहे.

राजस्थानमधील अजमेर येथे गुर्जर समाजाने ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. या विरोधात गुर्जर समाजाद्वारे आंदोलन केले जात असून एक रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच लोकांनी रस्त्यावर उतरून चक्काजामही केला. यामुळे काही काळ वाहतूकही खोळंबली होती.

अखिल भारतीय वीर गुर्जर समाज सुधार समितीचे अध्यक्ष हरचंद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाबाबत गुर्जर समाजामध्ये आक्राशाची भावना आहे. त्यामुळे गुर्जर समाजाने वैशालनगरमधील देवनारायण मंदिरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. या चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे आणि चित्रपटामध्ये ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करू नये, तसेच सत्य घटनाही दाखवाव्या अशी आमची मागणी असल्याचेही हरचंद म्हणाले.

जानेवारीमध्ये होणार प्रदर्शित

दरम्यान, ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट चंद्रपकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला असून हा चित्रपट 22 जानेवारी 2022 ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. याच अक्षर कुमार आणि मानुषी छिल्लरची प्रमुख भूमिका आहे. गुर्जर समाजाचा विरोध आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबण्याचीही शक्यता आहे.