खोया खोया चांद; शतरंज के खिलाडी

>>धनंजय कुलकर्णी

हिंदुस्थानी सिनेमाला जगभर पोहोचवणारे ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांनी 1977 साली एक हिंदी चित्रपट बनवला होता ‘शतरंज के खिलाडी’. सत्यजित रे यांनी बनवलेला एकमेव पूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट होता (अर्थात नंतर त्यांनी सद्गती नावाची एक शॉर्टफिल्म 1981 साली दूरदर्शनकरिता बनवली होती). या चित्रपटाला त्या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचे रौप्यपदक मिळाले होते. सत्यजित रे यांची संपूर्ण हयात बंगाली भाषेमध्ये चित्रपट निर्माण करण्यामध्ये गेली. छत्तीस वेळेला त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला तसेच ऑस्कर, भारतरत्न, दादासाहेब फाळके, पद्मविभूषण असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते धनी होते.

1977 साली त्यांनी बनवलेल्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटाची कथा हिंदीतील नामवंत साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांची होती. खरं तर ही एक लघुकथा होती. यावर पूर्ण लांबीचा चित्रपट बनवणे अशक्य होते. त्यामुळे सत्यजित रे यांनी या कथेच्या आशयाला धक्का न देता अनुकूल अशी अनेक पात्रे या चित्रपटात आणली आणि या चित्रपटाची निर्मिती झाली. मुन्शी प्रेमचंद यांच्या या लघुकथेमध्ये मुख्य दोनच पात्र आहेत-नवाब मीर आणि नवाब मिर्झा. हे दोघेही अवध संस्थानच्या वाजीदअली शहा यांच्या दरबारातील सरदार आहेत. ते रईस नवाब आहेत. या कथानकाचा प्लॉट हा हिंदुस्थानातील 1857 च्या लढय़ाचा आहे.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तेव्हा हिंदुस्थानात आपले पाय रोवायला सुरुवात करत होती. इथल्या अनेक संस्थानिक आणि राजांना ते एकापाठोपाठ एक पराभूत करत संपूर्ण हिंदुस्थानवर त्यांचे अपामण करणे चालू होते. अवधचा नामधारी राजा वाजीदअली शहा हा कलासक्त, पण एक भोगविलासी राजा होता. तो त्याच्या गीत, संगीत आणि इतर मनोरंजनात दिवसरात्र व्यस्त असायचा. ‘यथा राजा तथा प्रजा’ त्याप्रमाणे जर राजालाच आपल्या राज्याशी/ संरक्षणाशी काही घेणेदेणे नसले तर प्रजा तरी काय करणार? त्यामुळे राज्यातील सर्व नवाब, सरदार आपापल्या भोग विलासात दंग होते. मीर आणि मिर्झा हे दोन सरदारदेखील प्रचंड गडगंज श्रीमंत असल्यामुळे त्यांना कशाचीच ददात नव्हती. राजाचेच राज्यकारभाराकडे लक्ष नव्हते तेव्हा हे तरी काय करणार? हे दोघेजण बुद्धिबळ खेळण्यांमध्ये दिवसरात्र गर्क असत. तासन्तास दिवसेंदिवस ते बुद्धिबळाचा पट मांडून आपल्या खेळातील लाकडी राजाच्या संरक्षणाच्या खेळी खेळत बसत! आपल्या आजूबाजूला काय घडते आहे? याची त्यांना अजिबात जाणीव नव्हती. या नवाबांना दिवसभर करायचे काय? हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे पैसे उडवणे हेच त्यांच्यापुढे काम होतं. मग पतंगबाजी असेल किंवा रेडय़ांच्या, कोंबडय़ांच्या झुंजी लावणे असेल अशा निरर्थक गोष्टींमध्ये ते आपला बहुमूल्य वेळ आणि पैसा वाया घालवत होते.

याच काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या अवध या संस्थानावर ताबा मिळवण्यासाठी चालून येणार आहे ही खबर त्यांना लागते. राजाचा एक नोकर त्यांना तशी बातमी देतो. हे दोघे सरदार घाबरतात. कारण आयुष्यात त्यांनी कधी लढाई केलेलीच नसते. ऐषारामात त्यांनी आयुष्य काढलेले असते. त्यामुळे आता लढायला जावे लागते की काय? या भीतीने हे दोघे रात्रीच्या अंधारात गावातून पळ काढून दूर एका मशिदीमध्ये जाऊन बसतात आणि तिथे आपला बुद्धिबळाचा डाव चालू ठेवतात! दुसऱया दिवशी ब्रिटिशांची फौज अवध संस्थानावर आाढमण करते. हे दोघे खिडकीतून ते दृश्य पाहतात आणि पुन्हा आपल्या खेळण्यात मग्न होतात. संध्याकाळी ब्रिटिशांची सेना अवधच्या राजाला कैद करून घेऊन जाऊ लागते. अवधमधील एकही सरदार ब्रिटिश सेनेला विरोध करत नाही. अगदी रक्तहीन ढांती होते. या दोन सरदारांना केवळ बुद्धिबळातील आपला लाकडी राजा कसा जिंकतो आणि त्याला आपण कसे वाचवायचे त्याची काळजी असते! आपला राज्यातला खरा राजा मेला की जिवंत, याचे त्यांना काही घेणेदेणे नसते. याच दिवशी मशिदीमध्ये खेळताना एकदा या दोघांमध्ये वाद होतो. हा वाद इतका टोकाला जातो की, निरर्थक खेळातील आपल्या लाकडी राजाला वाचवण्यासाठी दोघे एकमेकांवर तलवारी उपसतात आणि एकमेकांचा जीव घेतात!

मुन्शी प्रेमचंद यांनी ही कथा लिहिताना एक प्रातिनिधिक स्वरूपात होती. राजा आणि प्रजा आपल्या धुंदीत दंग होती आणि त्याचा शेवट कसा झाला हे त्यांना दाखवायचे होते. रे यांनी या प्लॉटवर चित्रपट बनवताना यात दोन्ही सरदारांच्या बेगम, त्यांचे नोकरचाकर, या बेगमांची लफडी तसेच राजाचा छांदिष्टपणा आणि एकूणच लखनऊमधील नवाबी थाटाचं वातावरण खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं होतं. या चित्रपटात सत्यजित रे यांनी व्हाइसरॉयच्या भूमिकेसाठी थेट रिचर्ड अटेनबरो यांना आणलं होतं (यांनीच नंतर 1981 साली ‘गांधी’ चित्रपट दिग्दर्शित केला होता). या चित्रपटाला संगीत स्वत सत्यजित रे यांनीच दिले होते. यात वाजीदअली शहाची भूमिका करणाऱया अमजद खान यांनी एक ठुमरी गायली होती. अमजद खान यांची ‘शोले’तील भूमिका सत्यजित रे यांना खूप आवडली होती. अमजद खान स्वत रंगभूमीवर काम करणारे कलाकार होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या त्या काळातील इमेजला छेद देणारी वाजीदअली शहाची भूमिका स्वीकारली होती. नवाब मिर्झा यांच्या भूमिकेत संजीव कुमार होते. सईद जाफरी तेव्हा लंडनमध्ये रंगभूमीवरील अग्रणी कलाकार होते. त्यांनी यात नवाब मीरची भूमिका साकारली. त्यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र त्याला अजिबात व्यावसायिक यश मिळाले नाही. याचे कारण सत्यजित रे यांना हुकमी यशाच्या हिंदी सिनेमाचा फॉर्म्युला काही माहीत नव्हता. किंबहुना त्यांनी त्या पद्धतीने सिनेमा बनवण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. त्यामुळे साहजिकच चित्रपटाला मर्यादित व्यावसायिक यश मिळाले. रे यांच्या या सिनेमाची जागतिक पातळीवरदेखील फारशी दाखल घेतली गेली नाही. सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला पूर्ण लांबीचा हिंदी सिनेमा एवढीच याची आठवण उरली आहे. चित्रपटातील उर्दूप्रचुर लखनवी संवाद जबरदस्त होते. पीरेड फिल्मकरिता जी वातावरण निर्मिती लागते ती योग्य होती. कलाकारांच्या बाबतीत बोलायचं तर संजीव कुमार आणि सईद जाफरी यांनी आपापल्या भूमिका अप्रतिम रीतीने निभावल्या. शबाना आझमी आणि फरिदा जलाल यांनी या दोन सरदारांच्या बेगमांची भूमिका तर फारुख शेख यांनी त्यांच्या बेगमच्या प्रियकराची भूमिका मस्त निभावली होती. अमिताभ बच्चन यांच्या स्वरात ही कहाणी चित्रपटात पुढे जाते.

एकूणच लखनवी तहजीब, रंगीलापण सिनेमात छान दाखविले होते. हिंदुस्थानला पारतंत्र्यात लोटण्याच्या महापापाच्या अनेक कारणांपैकी इथल्या राजांची, संस्थानिकांची भोगविलासी वृत्ती यामागे होती हे यातून ठळकपणे अधोरेखित केलं होतं.
[email protected]
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)