अवकाशाशी जडले नाते

अवकाश तंत्रज्ञानाच्या वापरापासून ते निरीक्षण करण्यायोग्य विश्वापर्यंत अवकाश संशोधनातल्या नव्या घडामोडींची माहिती ठेवणारी व सातत्याने त्याचा अभ्यास करणारी एक तरूण खगोल शास्त्रज्ञ डॉ. विनिता नवलकर!

अवकाशाचा जेवढा अभ्यास करू तेवढा थोडा असल्यामुळे बरेचसे देश यावर सतत संशोधनपर काम करत आहेत. आपल्या देशानेही अनेक अंतराळ मोहिमा राबवून ‘चांद्रयान 3’ मोहीम यशस्वी करून जगात चौथ्या नंबरवर शिक्कामोर्तब केला आहे. पण त्याआधी काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘अॅस्ट्रोसॅट’ या खगोलीय उपग्रहाची निर्मिती झाली. या ‘अॅस्ट्रोसॅट’मध्ये पाच यंत्रे व दुर्बिणी सामावलेल्या असतात. यातल्या ‘सॉफ्ट एक्स रे’ दुर्बिणीवर विनिताने काम केले आहे. ‘अॅस्ट्रोसॅट’ हा संशोधनातला यशस्वी उपग्रह मानला जातो.

लहानपणी शाळेच्या लायब्ररीत असलेल्या अंतराळ या विषयावरील पुस्तके विनिताच्या वाचनात आली. कुतूहलापोटी वाचन वाढत गेले. मुळात तिला भौतिकशास्त्रात चांगलीच गती होती. पुढे एम. एस्सीला ‘इंस्टिमेंटेशन’ हा विषय घेतला व नंतर पीएचडीसाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) गाठले. पीएचडी करताना तिने ‘अॅस्ट्रोसॅट’चा भाग असलेल्या ‘सॉफ्ट एक्स रे’ दुर्बिणीच्या निर्मितीप्रक्रियेत मार्गदर्शकांच्या मदतीने मोलाचे योगदान दिले आहे. या दुर्बिणीचे दृष्टिक्षेत्र मोठे असल्याने निरीक्षण करणे, अवकाशातले दृश्य व अतिनील लहरींचे छायाचित्र घेणे हे दोन्ही एकाच वेळी शक्य झाले आहे. यातले मिरर, कॅमेरा, डिटेक्टर्स, सेन्सर्स सगळय़ा तापमानात काम करणारे आहेत. त्यांच्या ग्राऊंड पॅलिबरेशनवर विनिताने काम केले आहे. तिने अहमदाबादमध्ये फिजिकल रिसर्च लॅबमध्ये काही काळ संशोधन केले.

सध्या ती जर्नल ऑफ व्हिज्युलाइज्ड एक्सपिरिमेंट्स या अमेरिकास्थित जर्नलची संपादिका आहे. हे प्रामुख्याने अध्यापनासाठी लागणारे स्टडी मटेरियल आहे जे शिकवताना उपयोगी पडत असल्याचे तिने सांगितले. दुर्बिणीतून दिसणाऱया विश्वाबद्दल विनिता म्हणाली, ‘‘अंतराळ हे ब्लॅक अॅण्ड व्हाइट असते. पण त्यातले आकार, छटा, गॅलेक्सी, नेब्युला, व्हर्लपुलचे सौंदर्य न्याहळताना खूप आनंद मिळतो. ते वारंवार शोधायचे आणि परत परत पाहायचे.’’ तिचे बोलणे आपल्या आकलनापलीकडे असले तरी तिच्या चेहऱयावरचा आनंद आणि आवाजातला आत्मविश्वास भारावून टाकतो.

अंतराळ मोहिमांवर व्याख्यान

कॉलेजमध्ये असताना ती नियमितपणे खगोल मंडळात जायची. “आवड आणि कुतूहल होतेच, पण तिथे होणारी सत्रं आणि व्याख्यानांनी मला दिशा दिली. तिथल्या वेधशाळेने अवकाश न्याहाळण्याचा अनुभव दिला. तिथे अनेक दिग्गज यायचे. त्यांचे उचित मार्गदर्शन लाभले. खगोल मंडळांशी संलग्न संस्थांकडून छान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला,’’ विनिताने माहिती देत सांगितले. विविध प्रकारच्या दुर्बिणींवर तिने अभ्यास केला आणि मग स्वतः दुर्बीण (telescope) हाताळायला शिकल्यावर तिने स्वतःची दुर्बीण आणली व अॅस्ट्रो पह्टोग्राफीमध्ये प्रावीण्य मिळवले. आज ती अॅस्ट्रो फोटोग्राफीवर, खगोल शास्त्रीय विषयांवर मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग व सेंटर फॉर एक्सिलन्स इन बेसिक सायन्सेस कॉलेजेसमधून लेक्चर्स देते. ऑलिम्पियाड विद्यार्थ्यांनाही तिचे मार्गदर्शन लाभले आहे. चांद्रयान मोहिमांवरही ती लेक्चर्स देते. खऱया अर्थाने रॉकेट सायन्स सोपे करून ती सांगते.

तरुणांसाठी मोठी संधी

चांद्रयान 3, आदित्य एल 1 आणि एक्स्पोसॅट या तीन मोठय़ा खगोलशास्त्रीय मोहिमा तसंच इतर अंतराळ मोहिमा गेल्या काही वर्षांत यशस्वी करून आपल्या देशाने खगोलशास्त्र्ा आणि अवकाश तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे खगोलशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी आज एक मोठे दालन खुले झाले आहे.