निळवंडेच्या कामात एकही मदत न करणारे श्रेय घेऊ पाहत आहेत, बाळासाहेब थोरात यांची टीका

सातत्याने पाठपुरावा करून काम केले म्हणून निळवंडे धरण, डावा आणि उजवा कालव्याचे काम पूर्ण झाले. या कामात एकही मदत न करता सातत्याने अडचणी निर्माण करणारे आज श्रेय घेऊ पाहत असल्याची टीका धरण व कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून राज्य सरकारमध्ये ताळमेळ नसून आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

नांदुरी दुमाला येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, साहेबराव कवडे, लहानभाऊ पा. गुंजाळ, संपतराव डोंगरे, आर. बी राहणे, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, रमेश गुंजाळ, दूधसंघाचे संचालक विलास कवडे, मारुती कवडे, ॲड. मीनानाथ शेळके, सरपंच अर्चना शेळके, सोमनाथ गोडसे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, 1989 मध्ये भंडारदर्‍याच्या हक्काच्या पाण्याकरता मोठा लढा झाला. त्यानंतर निळवंडे धरण व कालव्यांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. आदर्शवत पुनर्वसन केले, मागील अडी वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठा निधी मिळवला. त्यामुळे कालव्यांची कामे पूर्ण झाली. कोरोना संकटात शंभर फूट उंचीवर जाऊन म्हाळादेवी जलसेतूची पाहणी केली. अविरतपणे काम सुरू ठेवले काम कोणी केले आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. ज्यांनी या कामात कधी मदत केली नाही, अडचणी निर्माण केल्या तेच लोक आता श्रेय घेण्यासाठी खटाटोप करत आहेत मात्र जनता त्यांना ओळखून आहे.

संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करतो आहे येथील सहकार, सुसंस्कृत राजकारण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धती ही राज्यासाठी आदर्शवत आहे. सध्या राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही एकमेकावर होणारी शाब्दिक हल्ले चांगले नाही आपण लोकशाही व संविधानावर विश्वास ठेवून काम करत असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला

तर माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की , निळवंडे धरण आणि कालवे हे फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच झाले आहे. बाकीचे आता कितीही प्रसिद्धीसाठी खटाटोप करत असले तरी जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडत नाही. तर माधवराव कानवडे म्हणाले की , आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाहण्यासाठी संघर्ष केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याकडून संघर्षाच्या वारसा घेताना आमदार थोरात पाण्यासाठी लढले आहे. त्यांच्या माध्यमातून मिळालेले पाणी हे पुढील अनेक पिढ्यांसाठी समृद्धी निर्माण करणारे आहे.