‘इंडिया’चा धसका भाजपने घेतला; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल

भाजपच्या तोडफोडच्या नीतीमध्ये सर्वसामान्य जनता अक्षरशः भरडली जात आहे. सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. हे सर्व लक्षात घेता, आता लोकांसमोर देशातील अनेक घटक पक्ष एकत्र आलेला ‘इंडिया’ हाच एक चांगला पर्याय उपलब्ध असून, या ‘इंडिया’चा धसका भाजपने घेतल्याचा हल्लाबोल आज माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला.

एका स्थानिक कार्यक्रमासाठी काही काळ कोल्हापूरच्या जिल्हा दौऱयावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील, राजू आवळे, जयश्री जाधव आदी उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले, ‘इंडिया’मध्ये जेवढे पक्ष आहेत, त्या सर्वांशी चर्चा करून, निश्चितपणे एक वेगळा पर्याय इंडिया देऊ शकतो. आम्ही अभेद्य आहोत. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर जर इंडियामध्ये आले तर त्याचा नक्कीच फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बीआरएसची भूमिका भाजपला मदत करण्याची आहे. तसेच घराणेशाहीला उमेदवारी दिली जाणार नसल्याचे भाजपचे नेते सांगत असले, तरी हे तोडजोड करून राजकारण करत आहेत, त्याचा अर्थ काय? तोडफोड करून उमेदवार देतात आणि घराणेशाही नाही, असे म्हणत असल्याकडे लक्ष वेधून, राज्यात भाजपने किती तोडफोड केली आहे पाहा. आमच्या नव्या आघाडीचा धसका भाजपने घेतल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांना कोण चीतपट करतंय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकांनी आपल्याला चीतपट करण्याचा प्रयत्न केल्याचे विधान केले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनीच बोलले पाहिजे, असे सांगून आज अनेक जिह्यांत प्रशासकीय अधिकारी नाहीत. फक्त वेगवान सरकार म्हणून चालणार नाही, तर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. राज्याच्या आर्थिक विकासाचा गाडा बिघडला असून, काही ठिकाणी पालकमंत्रीही नाहीत. बरेचजण झेंडावंदनमंत्री असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षण प्रकरणी केंद्राने निर्णय घेणे गरजेचे

मराठा आरक्षणाचा मुद्दा आपण जवळून हाताळलेला आहे. जोपर्यंत केंद्रात इंदिरा सहानी प्रकरणात 50 टक्क्याच्या आरक्षणाच्या मर्यादेत बदल होत नाही, केंद्र सरकार जोपर्यंत घटना दुरुस्ती करत नाही, तोपर्यंत हा मुद्दा सुटणार नाही. त्यामुळे आता दिल्लीत बैठक घ्या. मुंबईत दहा बैठका घेऊनही याबाबत काही होणार नसल्याचा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.