अदानी आणि मोदी यांचा संबंध काय? मुंबईत दाखल होताच राहुल गांधी यांनी तोफ डागली

उद्योगपती गौतम अदानींकडील पैसा कोणाचा आहे? पंतप्रधान मोदी याविषयी काहीच का बोलत नाहीत? सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणा अदानी प्रकरणाचा तपास का करत नाहीत? असे थेट सवाल करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला. पुढील आठवडय़ात जी-20 शिखर परिषदेसाठी विविध देशांचे नेते दिल्लीत येत आहेत. अदानींवरील आरोपांमुळे हिंदुस्थानची आणि पंतप्रधानांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सर्वच प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशी झाली पाहिजे या मागणीवर आपण ठाम असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी बैठकीसाठी राहुल गांधींचे आज आगमन झाले. त्यावेळी पत्रकार परिषदेत अदानींवरील नव्या आरोपांबाबत राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली. अदानी यांच्यावरील नव्या आरोपांबाबत आंतरराष्ट्रीय दोन प्रसिद्ध वृत्तपत्रांनी तपशीलवार माहिती प्रसिद्ध केली आहे. अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्या कथित संबंधावर या वृत्तपत्रांमध्ये भाष्य करण्यात आले आहे. मात्र, आपल्या सेबी संस्थेने अदानी यांना क्लीन चिट दिली आहे. धक्कादायक म्हणजे हा क्लीन चिट देणारा अधिकारी आता अदानी यांच्या ‘एनडीटीव्ही’चा एक संचालक आहे. याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरते आहे. या सगळ्याची संसदीय समितीकडून चौकशी व्हायलाच हवी.

एकूण प्रकरण पाहिलं तर असं वाटतं की हिंदुस्थानातील बंदरे आणि विमानतळ खरेदी करण्यासाठी एका पंपनीला विदेशी पैसा पुरवण्यात येत आहे. मोदी याविषयी गप्प कसे राहू शकतात, त्यांना यात काही वावगं कसं वाटत नाही, सीबीआय, ईडी सारख्या तपास यंत्रणा याची चौकशी का करत नाहीत, असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले. गौतम अदानींचे बंधू विनोद अदानी हे या मागचे मास्टरमाईंड आहेत. अदानी यांच्या कंपनीमध्ये नासर अली शाबान अहली आणि चीनच्या चांग चुंग-लिंग यांची गुतंवणूक आहे. अदानी जर भारतात विकास प्रकल्प राबवतात तर त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीचा पैसा कसा? अदानींची पंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, मग चीनी व्यक्तीची गुंवतणूक त्यामध्ये कशी काय? ती का आहे याचीही चौकशी झाली पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

विशेष अधिवेशन बोलविण्यामागेही भय असावे

जेव्हा जेव्हा अदानींशी संबंधित प्रकरण समोर येते, उल्लेख होतो तेव्हा पंतप्रधान अस्वस्थ होतात, घाबरतात. मी संसद भवनात काही बोलल्यावर लगेच माझी खासदारकी रद्द करण्यात आली होती. हे सर्व प्रकरण पंतप्रधानांच्या निकटचे असल्यामुळेच अशी घबराट होत असावी असे मला वाटते. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यामागेही असलेच काही भय असावे, असे त्यांनी सांगितले.

आता हा मुद्दा ‘मोदानी’ झाला

जयराम रमेश यांनीही, काँग्रेसने अदानींसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन धारण करून असल्याचा आरोप केला. याच प्रश्नांमुळे राहुल यांना अपात्र ठरवण्यात आले होते. आता हा मुद्दा केवळ अदानींपुरता राहीला नसून याला ‘मोदानी’ स्वरूप प्राप्त झाले आहे, असे रमेश म्हणाले.