मनतरंग – डेट रेप

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

आज बऱ्याच तरुण मुली वा मुलंही प्रेमसंबंधांत स्पष्ट बोलू शकत नाहीत आणि या नात्यातील पिळवणुकीचा सामना करत असतात. ‘भावनिक अवलंबन’ आणि ‘एकटेपण’ या मुख्य कारणांमुळे हे प्रकार घडलेले आहेत. प्रेमसंबंधात असलेल्या तरुण-तरुणींना या सगळ्याची निश्चितच माहिती असते, पण तरीही भावनिक गुंतागुंत असलेलं हे नातं सहजी तोडता येत नाही. याबाबत वेळीच योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे.

रुची (नाव बदालेले आहे) समुपदेशन करून घेण्याकरिता आली ती जराशी साशंकता, मनामध्ये अस्वस्थता घेऊनच. तिला स्वतःकरिता काही मार्गदर्शन हवे होते. “अॅक्चुअली, मलाच कळत नाहीये की, सुरुवात कशी करावी ते?” असं म्हणतच तिने स्वतःच्या समस्येबद्दल सांगण्यास सुरुवात केली. रुची जवळपास वीस-बाविशीतील आणि नुकतीच नोकरीला लागलेली तरुणी होती. आयुष्यात आता कुठे मार्गाला लागत होती. नोकरी करता करता उच्च शिक्षणासाठी पैशांची जमवाजमवही करत होती. कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरह्यूमध्ये सिलेक्ट होऊन पहिला जॉब मिळाल्याचा अभिमान तिच्या बोलण्यातून जाणवत होता आणि त्याचबरोबर ‘पहिलं प्रेम गवसल्याचा’ आनंदही तिच्या देहबोलीतून व्यक्त होत होता. “मग समस्या काय आहे?” हे विचारताच “मी वाहवत गेले आहे” असं पटकन रुची बोलून गेली आणि तिच्या डोळ्यांत पाणी आले.

“मॅम, मला खरं तर आता त्याच्याशिवाय जगण्याचा विचार करणं अशक्य आहे. तो आणि मी एकमेकांचेच झालेलो आहोत. आमच्या घरीही हे आता माहिती झालेलं आहे, पण…” असं म्हणून ती एकदम थांबली. समोरच ठेवलेला पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला आणि ग्लास हातात धरतच तिने पुढे सांगायला सुरुवात केली…“तो आता माझ्या बाबतीत पझेसिव्हही व्हायला लागला आहे. दिवसातून जवळपास शंभरेक मेसेजेस तरी आमच्यात होत असतील. त्यात जर त्याला पटकन रिप्लाय दिला नाही किंवा देता आला नाही तर मला त्याचा फोन असतो आणि मग माझा आवाज ऐकल्यावर तो शांत होतो.” एवढं बोलून रुचीने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला.

“मला तो खूप आवडतो मॅम, पण पझेसिव्हनेस आय कान्ट टॉलरेट” असं म्हणून रुचीने डोळ्याला रुमाल लावला. “नक्की काय झालंय?” असं पुन्हा तिला विचारावं लागलं. कारण अजूनही तिच्या समस्येचा उलगडा काही तिच्या बोलण्यातून होत नव्हता. एक लांब सुस्कारा सोडत रुचीने सांगायला सुरुवात केली. तिने जे काही सांगितलं ते खरोखर गंभीर होतं.

रुची आणि तिच्या प्रियकराचं नातं हे तणावपूर्ण होतं. त्याला तिच्याबद्दल बरीच असुरक्षितता होती. रुची स्वतंत्र आणि आधुनिक विचारांची होती. त्यामुळे बिनधास्तपणा तिच्या अंगी आलेला होता. तिचा मित्रपरिवारही चांगला होता. रुचीबरोबर हा मित्रपरिवार नेहमी या ना त्या माध्यमातून संपर्कात असायचा. तिच्या प्रियकराला हे कुठेतरी असुया निर्माण करायचं. त्या असुयेपोटी आणि असुरक्षिततेपोटी तो वारंवार रुचीकडून शरीरसुखाची मागणी करू लागला होता. सुरुवातीला तिला ही त्याची मागणी म्हणजे ‘त्याचे तिच्याबद्दलचे आकर्षण आणि प्रेम’ वाटत होते. त्यामुळे तिनेही स्वखुषीने त्याच्या शरीरसुखाच्या मागण्या पूर्ण केल्या, पण नंतर नंतर त्याची तिच्यावर बळजबरी (“माझ्यावर खरं प्रेम असल्याचं सिद्ध कर”) होऊ लागली. तिच्या मनात नसतानाही ती त्याच्या मागण्या पूर्ण करत होती आणि गर्भपाताच्या गोळ्याही खात होती. शरीरसुखानंतर दोघांनाही अपराधी वाटत असे. मात्र रुचीला त्याचे नैराश्यही येऊ लागले होते. त्याच नैराश्यावर मात्र करण्यासाठी आणि या सर्वावर तोडगा काढण्यासाठी तिने समुपदेशनाचा मार्ग धरला होता.
रुचीबरोबर जे काही घडत होतं ते ‘डेट रेप’ या प्रकारात मोडणारं होतं. म्हणजेच त्या दोघांचे येणारे शारीरिक संबंध हे तिच्या इच्छेविरुद्ध आणि त्याच्या दबावामुळे येत होते. अर्थातच याचा परिणाम रुचीवर होऊ लागला होता. तिची अवस्था कात्रीत पडल्यासारखी झाली होती. कारण त्या युवकामध्ये भावनिक गुंतागुंत असल्याने ती स्पष्ट नकार द्यायला घाबरत होती. त्यामुळे एरवी बिनधास्त आणि रफ-टफ असणारी रुची या प्रकरणामुळे संवेदनशील झाली होती.

रुचीसारख्या आज बऱ्याच तरुण मुली या प्रकाराचा सामना करत असतील. ‘भावनिक अवलंबन’ आणि ‘एकटेपण’ (ओढवून घेतलेलेही असू शकते) या अनेक कारणांपैकी असलेल्या मुख्य कारणांमुळे हे प्रकार घडलेले आहेत. प्रेमसंबंधात असलेल्या तरुण-तरुणींना या सगळ्याची निश्चितच माहिती असते, पण तरीही हे प्रकार काही अपवाद वगळता अनेकींच्या बाबतीत घडू लागले आहेत. वर नमूद केल्याप्रमाणे घरांमध्ये असणारा विसंवाद, पालक-मुलांमधली वाढणारी दरी, मुलाच्या मानसिक गरजांकडे पालकांचे झालेले दुर्लक्ष या सगळ्याची परिणती मुलांच्या एकटेपणात होते. मुलांना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पालकांची गरज असतेच. ती पूर्ण न झाल्यास मुलं त्यांचा भावनिक आधार बाहेर शोधतात.

हल्ली इंटरनेटसारख्या प्रभावी माध्यमाच्या मेहेरबानीमुळे हा आधार एका क्लिकवर मिळतो. तिथूनच चालू होतो प्रेमाचा खेळ, ज्याला तरुणी खरं समजून चालतात.
रुचीच्या बाबतीत असंच काहीसं झालं होतं. तिचे आई-वडील हे आपापल्या व्यापात व्यस्त असल्याने तिला म्हणावा तसा त्यांचा वेळ मिळू शकला नाही. हाच वेळ तिला तिच्या प्रियकराने दिला आणि त्या बदल्यात तिच्या शरीराची मागणी केली. ती यात कधी आणि कशी ओढली गेली हे जरी तिला समजलं नसलं तरी तिला यातून बाहेर पडायचं हे सुचत चाललं होतं. मात्र गरज होती ती तिला खंबीर आधार देण्याची. ‘ती एकटी नाही’ हा दिलासा देण्याची आणि मुख्य म्हणजे रुचीला ‘नाही’ म्हणायला शिकवण्याची.
रुचीबरोबर सत्रे घेतानाच तिला त्याच्याशी सर्व संबंध तोडण्यास सांगण्यात आले. शिवाय तिच्या आईवडिलांना या सर्वाची कल्पनाही देण्यात आली, जेणेकरून तिचा प्रियकर याद्वारे तिला ब्लॅकमेल करू शकणार नाही. तिच्या आईवडिलांना हा धक्का होता, पण त्याचबरोबर आपलं आपल्या मुलीच्या बाबतीत काय चुकलं हेही त्यांना काही दिवसांनी कळून चुकलं. त्या तिघांचीही वैयक्तिक तसेच एकत्रित सत्रे घेतली गेली, ज्यात कौटुंबिक संबंध कसे अबाधित ठेवता येतील यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. त्याकरिता तिघांनाही त्यांच्या स्वतःच्या अपराधीपणातून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःला दोष न देण्याबाबतही मार्गदर्शन केले गेले.

या सर्वाचा अपेक्षित परिणाम तेव्हा दिसून आला जेव्हा रुची तिच्या आई-वडिलांसमवेत त्या मुलाच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना त्याच्या वर्तणुकीबद्दल सांगून आली. तसेच त्याच्याविरुद्ध पोलीस केस करण्यासही ती न घाबरता पुढे आली.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)

[email protected]