नव्या कापूस खरेदी नियमाला जिनींगमालकांचा विरोध

भारतीय मानक ब्युरोने कापसाच्या गुणवत्तेसंदर्भात नव्याने आणलेल्या नियमाला विदर्भ कॉटन असोसिशनने विरोध केलाय. कापसाची गुणवत्ता एकसारखी आणि उत्तम असली पाहिजे, अशी अट घालून या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक दंडाची तरतूद या नियमात आहे. यामुळे कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची विदर्भातील सर्वात मोठी संघटना विदर्भ कॉटन असोसिशनने या नियमाला प्रखर विरोध करण्याचे जाहीर केले.

कापूस उत्पादक शेतकरी विविध प्रजातींच्या, विविध गुणवत्तेच्या बियाण्याची लागवड करतो. शिवाय मातीचा पोत प्रत्येक ठिकाणी भिन्न असतो. वातावरण भिन्न असते. अशावेळी एकाच गुणवत्तेचा कापूस सर्वत्र कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करून संघटनेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सविस्तर निवेदन पाठवले आहे. कापसाची गुणवत्ता नव्या नियमानुसार तपासली जाणार असेल तर मग जिनिंग मालक कापूस घेणारच कशाला, असा प्रश्न व्यापाऱ्यांच्या संघटनेने उपस्थित केलाय. कापूस घेणे बंद झाले तर शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक आर्थिक फटका बसेल, अशी भीतीही संघटनेने व्यक्त केलीय. त्यामुळे बीआयएस लागू केलेले मानक नियम मागे घ्यावे अन्यथा जीनिंग प्रेसिंगच्या निविदा आम्ही भरणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.