Lok Sabha Election 2024 महायुतीत नाराजांची धुळवड सुरूच

eknath shinde devendra fadnavis ajit pawar

धुलिवंदनाचा सण आज देशभरात उत्साहात साजरा झाला. महायुतीमध्ये मात्र राजकीय धुळवड सुरूच आहे. जागावाटपावरून सुरू झालेले वाद थांबलेले नाहीत. उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुंबई-दिल्ली-मुंबई वाऱया सुरूच आहेत. दावे-प्रतिदावे, बैठकांचे सत्र, शक्तीप्रदर्शने आणि नाराजांच्या मनधरणीसाठी करावी लागणारी उठाठेव यामुळे महायुतीमधील भारतीय जनता पक्ष, मिंधे गट आणि अजित पवार गट या महायुतीमधील प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेले मतभेद मिटलेले नाहीत. त्यामुळे जागावाटपही अद्याप जाहीर झालेले नाही. माढा, सातारा, नाशिकसह मुंबईतील मतदारसंघांबाबत निर्माण झालेला तिढा सोडवताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस घामाघूम झाले आहेत. मिंधे गटाचे कार्यकर्ते तर काही जागांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दाद देईनासे झालेत तर अजित पवार गटाची बारामतीची जागा वाचवण्यासाठी अक्षरशः दमछाक झाली असल्याचे दिसून येत आहे. नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील वाद मिटवण्यात नेत्यांना यश आलेले नाही. रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपाने दुसऱयांदा उमेदवारी देऊन स्वपक्षीयांबरोबरच मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांचीही नाराजी ओढवून घेतली आहे. मागच्या वेळी निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेऊनही नंतर त्यांनी युतीधर्म पाळला नाही, विकासकामे करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही, असे मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सोलापूरच्या कुर्डुवाडीत झालेल्या मिंधे गटाच्या निर्धार मेळाव्यात पदाधिकाऱयांची ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि निंबाळकरांनी जाहीर हमी दिली तरच त्यांचा प्रचार करायचा, अशी भूमिकाही या मेळाव्यात घेण्यात आली.

रामटेकमध्ये मिंधे गटाच्या कृपाल तुमानेंचा पत्ता कट

रामटेक मतदारसंघात विद्यमान आमदार कृपाल तुमाने यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी नुकताच मिंधे गटात प्रवेश केला. पारवेंना रामटेकमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे किंबहुना त्याच अपेक्षेने त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता तुमानेंचे काय करायचे, असा यक्षप्रश्न मिंधे गटासमोर निर्माण झाला आहे. रामटेकमध्ये काँग्रेसची पारंपरिक मते आव्हान उभी करू शकतात. त्यामुळे तुमानेंना पुन्हा उमेदवारी देण्यापेक्षा पारवे यांचा पर्याय योग्य ठरेल, असा सल्ला नागपुरातील भाजपा नेत्यांनीच एकनाथ शिंदे यांना दिला होता.

साताऱयातील गुंतागुंत कायम; उदयनराजे दिल्लीतच 

सातारा मतदारसंघातील गुंतागुंतही कायम आहे. कमळ चिन्हावरच निवडणूक लढवायची आहे असा हट्ट धरत उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले चार दिवसांपासून दिल्लीत आहेत. परंतु अद्याप भाजपकडून काहीच सिग्नल मिळालेला नाही. साताऱयाच्या जागेवर अजित पवार गटानेही दावा केला आहे. अजित पवार गटाने ती जागा उदयनराजेंना देण्याचीही तयारी दर्शवली आहे. परंतु त्यासाठी घडय़ाळ चिन्हाची अट घातली आहे.

या मतदारसंघांमध्ये धुसफूस 

अमरावती, परभणी, ठाणे, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, बारामती, शिरूर, रायगड, मावळ, धाराशीव, कोल्हापूर, हातकणंगले, शिर्डी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांवरून धुसफूस सुरू आहे.

नाशिकच्या जागेवरून तणाव; भाजप कार्यकर्त्यांचा अन्नत्यागाचा इशारा

भाजपा आणि मिंधे गटात नाशिकच्या जागेवरून तणाव वाढला आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा नाशिकमधून इच्छुक आहेत. मुख्यमंत्रीपुत्राने त्यांची उमेदवारी घोषित करून टाकली असून हेमंत गोडसे यांनी रविवारी थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानासमोर तीन तास ठिय्या दिला.त्यानंतर आज भाजपाचे नाशिकमधील इच्छुक उमेदवार देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी पोहोचले. त्यात आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि दिनकर पाटील यांचा समावेश होता. नाशिकची जागा भाजपाला मिळावी, तिथे भाजपची चांगली ताकद आहे असे त्यांनी फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितल्याचे समजते. नाशिकच्या जागेसाठी भाजपचे कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलन करतील असा इशारा दिनकर पाटील यांनी दिला आहे.