अजित पवार गटाच्या आमदार पुत्राला मराठा तरुणांनी गावातून हाकलले

माढा विधानसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे आज पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे शासकीय योजनेतील विकासकामांच्या शुभारंभ सोहळ्यासाठी आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर गावातील मराठा तरुणांनी त्यांना घेराव घालत जाब विचारत चांगलीच फजिती केली. यापुढे गावात यायचे असेल तर समाजाला विचारूनच या; अन्यथा अपमानित व्हावे लागेल, असा सज्जड दम मराठा युवकांनी भरला.

तुमचे वडील सलग 15 वर्षे आमदार आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी काय केले? विधानसभा सभागृहात मराठा आरक्षणाबाबत कधीही आवाज उठविला नाही, असे सुनावत शिंदे कुटुंबाने कुणबी प्रमाणपत्र मिळविले आहे. मग समाजातील इतर लोकांना मिळवून देण्यासाठी तुम्ही काय केले? तुमच्या फायद्यासाठी काहीही राजकीय निर्णय घेता; मात्र मतदारसंघातील लोकांना कधी विश्वासात घेत नाही, असा संताप मराठा तरुणांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे-पाटील यांना 50 हजारांची मदत केली, अशी जाहीर वाच्यता तुम्ही केली. त्यानंतर मराठा समाजाने रुपया-रुपया वर्गणी काढून तुमचे पैसे परत केले. अन्य समाजाला आरक्षण द्या म्हणून आमदारांनी लेखी पत्र दिले. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कधी पत्र लिहिले नाही. तसेच सभागृहात कधीही आवाज उठवला नाही. त्यामुळे यापुढे गावात यायचे असेल तर समाजाला विचारून या; अन्यथा अपमानित व्हावे लागेल, असा सज्जड दम मराठा युवकांनी भरला. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत युवकांनी रणजित शिंदे व त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना गावातून अक्षरशः हाकलून लावले.