मराठा समाजच तुमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करेल! मनोज जरांगे-पाटील यांचा शिंदे-फडणवीसांना इशारा

‘मराठा आरक्षणासाठी शांततेने आंदोलन करणाऱया माता-भगिनींची डोकी फोडणाऱ्या राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आणायचे आहे. त्यासाठी आता सरकारची कोंडी करण्यासाठी प्रत्येक गावातील दोन मराठा युवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात साधारणपणे एक हजार उमेदवार उभे करा, तरच सरकार आरक्षणाबाबत ताळय़ावर येईल,’ असा हल्लाबोल मनोज जरांगे-पाटील यांनी केला. दरम्यान, ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाबाबत मर्यादा सोडली आहे; पण मराठा समाजच तुमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करेल. असा इशारा मनोज जरांगे यांनी शिंदे-फडणवीसांना दिला.

मनोज जरांगे हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. वैराग, मोहोळ, शेटफळसह अनेक ठिकाणी त्यांचा संवाद कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही जरांगे यांनी हल्लाबोल केला. ‘ते आमची एसआयटी चौकशी करणार आहेत; पण त्यांच्या आजूबाजूला असणाऱया भ्रष्टाचाऱयांकडे त्यांनी लक्ष द्यावे. माझ्याकडे 13 पत्रे व कागद सोडून काहीच सापडणार नाही. मी चौकशीला तयार असून, मागच्या दाराने पळून जाणारी अवलाद नाही,’ असा टोला लगावत, ‘आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षण द्या; अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील. असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.

तुम्हाला आता सुट्टी नाही
फडणवीसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या आडून हल्ला करण्याचा डाव केला आहे. त्यांचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. मी आता बाहेर पडलो आहे. मलाही पाहायचे आहे, कोणता भाजपचा कार्यकर्ता येतो हल्ला करायला. दहा टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी इतक्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याला शोभत नाही. तुम्हाला आता सुट्टी नाही. तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागला आहात,’ असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

वेळ गेलेली नाही, आता तरी वचन पाळा!
जरांगे-पाटील म्हणाले, ‘सगेसोयरे अधिनियमाचे अध्यादेशामध्ये रूपांतर करण्याची मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. आम्हाला याचे राजकारण करायचे नाही. फक्त सगेसोयरे अधिनियमाचे अध्यादेशामध्ये रूपांतर करून मराठय़ांना ओबीसीमधून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे. अजूनही वेळ गेलेली नाही; दिलेल्या वचनाचे आता तरी पालन करा. असे जरांगे म्हणाले.