येरवडय़ातील पोलिसांची जागा बिल्डरला देण्याचा होता डाव, ‘दादां’वर मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप

पोलिसांच्या घरासाठी असलेल्या जागेवर पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री दादांचा डोळा होता. त्यांनी अतिशय जवळच्या बिल्डरला संबंधित जागा मिळवून देण्याचा घाट घातला होता. मात्र त्याला आम्ही विरोध केल्यामुळे आजही ती जागा वादात अडकल्यामुळे न्यायालयात केस सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात केला आहे. त्यांनी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांचा उल्लेख न करता पुस्तकात हा खुलासा केला आहे.

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी पोलिसांसाठी राखीव असलेल्या येरवडय़ातील तीन एकर जागेबाबत लिखाण केले आहे. तत्कालीन पालकमंत्री दादांचा येरवडय़ातील मोक्याच्या जागी असलेल्या जमिनीवर डोळा होता. तीन एकर पोलिसांची जागा तत्कालीन पालकमंत्री दादांनी त्यांच्या संबंधातील बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा घाट घातला होता. त्या जागेचा लिलाव करण्याच्या निर्णयाचा प्रयत्न केला होता. मात्र संबंधित जागा पोलिसांना घरे बांधण्यासाठी आरक्षित होती. त्यासंदर्भात आम्ही दादांना माहिती देत आक्षेप घेतला होता. मात्र तरीही त्यांनी ती जागा बिल्डरला देण्याचा घाट घातला होता. त्यामुळे जागेचा वाद कोर्टात गेला आहे. आजही ती मालमत्ता पोलिसांच्या नावे असून प्रॉपर्टी कार्डही पोलिसांच्या नावाने आहे.

अजित पवारांकडून आरोप अमान्य…

पालकमंत्र्यांना अशा प्रकारच्या जमिनीचा लिलाव करण्याचा अधिकार असतो का? सरकारी जमीन आपण विकू शकत नाही.महसूल विभागाकडे अशी प्रकरणे जातात मंत्रिमंडळामध्ये त्यावर निर्णय होतो. असा निर्वाळा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीरा बोरवणकर यांचे आरोप अमान्य केले.माझा या प्रकरणाशी संबंध नाही. तुम्ही अधिकाऱयांशी चर्चा करून बघा, मी अशा प्रकरणांमध्ये नेहमी शासनाची बाजू घेतली आहे.माझ्यावर अशा प्रकरणांमध्ये दबाव आला तरी मी त्याची फिकीर करत नाही. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात धक्कादायक खुलासे

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. मात्र हे पुस्तक अजून प्रकाशित करण्यात आले नाही. विशेषतŠ पुणे पोलीस आयुक्त म्हणून काम करताना आलेल्या अनेक कठीण-कटू प्रसंगांचे लिखाण बोरवणकर यांनी केले आहे. दरम्यान, तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी फक्त दादांचा पोलिसांच्या जमिनीवर डोळा असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.