भाजप रिमोट दाबते तेव्हा अदानींना एअरपोर्ट, रेल्वेचे कंत्राट मिळते! राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर घणाघात

सध्या दोन रिमोट कंट्रोल चालत आहेत. एक रिमोट आमच्याकडे आहे. आम्ही रिमोटचे बटण कॅमेऱयासमोर दाबतो तेव्हा काही सेकंदांत हजारो-करोडो रुपये गरीब जनतेच्या थेट खात्यात जातात, पण भाजप लपून छपून रिमोटचे बटण दाबते. मोदी जेव्हा रिमोट कंट्रोलचे बटण दाबतात तेव्हा अदानींना एअरपोर्ट, रेल्वे आणि पायाभूत सुविधांचे कंत्राट मिळते, अशा शब्दांत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती आरोप केला. छत्तीसगडच्या बिलासपूरच्या तखतपूर येथून ग्रामीण आवास न्याय योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, संसदेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले, तुमचे अदानीशी नेमके नाते काय? सैन्य दलात, विमानतळ क्षेत्रात, शेतकऱयांच्या काळय़ा कायद्यात अदानीला फायदा करून देण्याचा प्रयत्न का केला गेला? कुठल्या नात्याने अदानीला फायदा करून दिला? त्यावेळी मला उत्तर मिळाले… माझे लोकसभा सदस्यत्वच रद्द करून टाकले असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. हिंदुस्थानचे सरकार आमदार, खासदार नाही तर कॅबिनेट सचिव आणि सचिव चालवतात. 90 सेक्रेटरी योजनेचा आराखडा तयार करतात आणि रुपये कुठे जातील हे ठरवतात असा जोरदार प्रहारही राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर केला. यावेळी राहुल गांधी आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तब्बल 669 कोटी 69 लाख रुपयांच्या 414 विकासकामांचे लोकार्पण केले.

जातीनिहाय जनगणना हिंदुस्थानचा एक्स-रे

आपल्या देशात केवळ 5 टक्के ओबीसी आहेत? असा सवाल करतानाच याचे उत्तर केवळ जातीनिहाय जनगणना केली तरच मिळू शकते असे राहुल गांधी म्हणाले. एखाद्या रुग्णाला जेव्हा दुखापत होते तेव्हा डॉक्टर त्याला एक्स-रे काढायला सांगतात, त्याचप्रमाणे जातीनिहाय जनगणना हिंदुस्थानचा एक्स-रे असल्याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले. या एक्स-रेतूनच देशात ओबीसी, दलित, आदिवासी, महिला आणि इतर जातीत किती लोक आहेत हे समजू शकते. हा डेटा एकदा समोर आला की मग सर्वांना समान हक्क देऊन देश पुढची वाटचाल करू शकतो, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांचा ट्रेनमधून 117 किमीचा प्रवास

छत्तीसगड येथील कार्यक्रम आटोपून काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी बिलासपूर ते रायपूर असा तब्बल 117 किलोमीटरचा प्रवास ट्रेनमधून केला. यावेळी त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आणि अधिकाऱयांना तशा सूचनाही केल्या.

आम्ही 15 लाखांची खोटी आश्वासने देत नाही

आम्ही 15 लाख रुपयांसारखी खोटी आश्वासने देत नाही, असा टोला राहुल गांधी यांनी इतर राज्यांतील काँग्रेस सरकारांचे उदाहरण देत मोदी सरकारला लगावला. आम्ही निवडणुकीत जी आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण केल्याचे राहुल गांधी म्हणाले. शेतकरी न्याय योजनेअंतर्गत 21 हजार कोटी रुपये इनपुट सबसिडीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. ज्या शेतकऱयांकडे जमीन नव्हती त्यांना आम्ही विसरलो नाही. त्यांना 7 हजार रुपये दिले. आदिवासींना वनाधिकार दिले गेले. आरोग्य सेवेअंतर्गत पाच लाख रुपये उपचाराकरिता उपलब्ध करून दिले. याचा 70 लाख कुटुंबांना लाभ मिळाला. 42 हजार जणांना रोजगार दिले. 1 लाख 30 हजार तरुणांना बेरोजगार भत्ताही दिल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.