फडणवीस सांगा, बंगळुरचा पैसा कुणाच्या खात्यात जमा झाला? खासदार विनायक राऊतांनी दिले आव्हान

बारसू येथील रिफायनरी विरोधी आंदोलनाला बंगळुरू येथून पैसा पुरवला जातो असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणी जनतेला बदनाम केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस तुम्ही अरामको कंपनीचे दलाल आहात. तुमच्याकडे गृहखाते आहे मग सांगा बंगळुरूवरून पाठवलेले पैसे कोणत्या आंदोलकाच्या खात्यात जमा झाले? असा सवाल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला. ते मराठा भवन येथे आयोजित केलेल्या रत्नागिरी शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

विनायक राऊत पुढे म्हणाले की, भाजपचे मुंबईतील अजून एक उपटसुंभ नेते आहेत. ते म्हणतात शिवसनेनेमुळे रिफायनरी पाकिस्तानात गेली. ज़र शिवसेनेत एवढी ताकद असेल तर एक दिवस तुम्हालाही आम्ही सत्तेवरून हाकलवून लावू असा इशारा राऊत यांनी दिला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात प्रकल्प पाकिस्तान गेल्याने 10 हजार कोटीचे नुकसान झाले. आधी तीन लाख कोटी म्हणत होते. जर रिफायनरी पाकिस्तानात जाणार असेल तर आम्ही सवा किलो पेढे आणि नारळ देऊन पाठवणी करू. कारण कोकणचा विनाश करणारी रिफायनरी आम्हाला नको असे राऊत यांनी ठणकावून सांगताना रिफायनरी पाकिस्तान गेली तर मग तुमचे विश्व गुरू काय करत होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आधीचे 224 आणि नंतरचे 301 परप्रांतीयांच्या खिशात जमिनी घालण्यासाठीच हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत रेटत होते असा आरोप त्यांनी केला.

यावेळी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख प्रदीप बोरकर, उपनेते आमदार राजन साळवी, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा महिला संघटक वेदा फडके,जिल्हा समन्वयक संजय पुनसकर,तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमपख प्रमोद शेरे, माजी जि.प.अध्यक्ष जयसिंग घोसाळे, माजी उपाध्यक्ष उदय बने, शहरप्रमुख प्रशांत सांळुखे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, महिला शहर संघटक मनिषा बामणे, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत उपस्थित होते.

रत्नागिरीची एकजूट भगवी लाट आणणार

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रत्नागिरी शहर मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला. मराठा भवन खचाखच भरले होते. ही गर्दी पाहून खासदार विनायक राऊत म्हणाले की, रत्नागिरीची ही एकजूट राज्यात भगवी लाट आणेल. आज हिंदू-मुस्लिम गळ्यात भगवा गमछा घालून बसले आहेत. ही एकजूट खूप महत्वाची आहे.

उद्योगमंत्री जे.के.फाईल्स कंपनी वाचवा

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत उद्योगमंत्री उदय सामंत श्वेतपत्रिका काढत आहेत.पण तुमच्याच मतदारसंघातील जे.के.फाईल्स कंपनी बंद पडत आहे ती वाचवा. त्या साखर कारखान्याना शंभर कोटी देता जे.के.फाईल्सला शंभर कोटी देऊन वाचवा अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.

रत्नागिरीत शिवसेनेचा आमदार

बाळ माने यांच्या पुढयातील ताट ओढून उदय सामंत आमदार झाले. यावेळी मात्र तसं ताट मिळणार नाही. रत्नागिरीचा पुढचा आमदार हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच असेल असे खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले.

नगरपरिषदेत आपलाच नगराध्यक्ष – राजन साळवी

उदय सामंत पहिल्या दोन निवडणूकीत थोड्या फरकाने निवडून आले होते. शिवसेनेत आल्यानंतरच त्यांचे मताधिक्य वाढले. कारण शिवसेनेची गावागावात ताकद आहे. ही ताकद दाखवून देऊच. आजचा मेळवा पाहिल्यानंतर नगरपरिषद निवडणूकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच नगराध्यक्ष असेल असा विश्वास शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.