हुंड्यात बीएमडब्ल्यू, सोनं आणि जमिनीची मागणी; लग्नास नकार दिल्याने डॉक्टरची आत्महत्या

हिंदुस्थानात आजही हुंड्याच्या जाचामुळे महिलांचा छळ होत आहे. हुंड्यामुळे काही महिलांनी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचललेले आहे. हुंड्याचा जाच होणाऱ्या काही पीडित महिलांना न्याय मिळतो तर काही जणी हे जगच सोडून देण्याचा निर्णय घेतात. केरळमध्ये एक भयानक घटना घडली असून, हुंडा देण्यास नकार दिल्याने तरुणाने लग्न मोडलं. हे सहन न झाल्याने डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली.

सदरील घटना केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम मध्ये घडली आहे. 26 वर्षीय शहाना तिची आई आणि दोन भावंडांसोबत राहत होती. तिच्या, वडीलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. शहाना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शस्रक्रिया विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत होती. याच रुग्णालयातील डॉ.रुवैसशी शहानाचे प्रेमसंबंध जुळले होते आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रुवैसच्या कुटुबियांनी हुंड्यात 15 एकर जमीन, बीएमडब्ल्यू (BMW) आणि 150 तोळे सोन्याची मागणी केली होती. जेव्हा डॉ.शहानाच्या कुटुंबीयांनी मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली होती ज्यामुळे रुवैसच्या कुटुबियांनी लग्नास नकार दिला. तेव्हापासूनच डॉ.शहाना नैराश्यात होती. याच नैराशामुळे तिने आत्महत्या केली असा आरोप कुटुबियांनी केला आहे. तिच्या बेडरुममध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते,”प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत.”

राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्याच्या महिला व बालविकास विभागाला सदर प्रकरणाची चौकशी करून  अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.