तुमचेही आतमध्ये जायचे दिवस येणार ! उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले

  • कोणी कितीही प्रयत्न करोत, हुकूमशहा येवोत, आम्ही मुंबई कोणाच्या हाती जाऊ देणार नाही.
  • चौकशी करणार असाल तर देशभरात सगळय़ांची करा, पण त्याच्यासाठी ज्या शहराचं नाव जगभरात झालं, जे शहर मुंबाआईच्या नावावरून स्थापन झालं त्या मुंबईला आणि मुंबईतल्या यंत्रणेला बदनाम करू नका.

माझ्या शिवसैनिकांना छळत आहेत. आमच्याकडे आला नाहीस तर आत जाशील असे धमकावत आहेत, पण हे जास्त काळ चालणार नाही. तुमचेही आतमध्ये जायचे दिवस येणार आहेत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. मशाल ही नुसती निशाणी नाही, आग आहे. या आगीशी खेळू नका. थोडे दिवस राहिलेत, आनंदात राहा. हेलिकॉप्टरने शेतात जा, आराम करा. आराममंत्री म्हणून एक खातं निर्माण करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मिंधेंना हाणला.

वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आज शिवसेना आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांची कार्यशाळा झाली. सभागृह तुडुंब भरले होते. या भरगच्च कार्यशाळेतून होऊ दे चर्चा… मन की बात नको, आता जन की बात करा, असे शिवसैनिकांना आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय देशमुख, आमदार ऋतुजा लटके, लक्ष्मण हाके यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, सचिव आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

…होऊ द्या चर्चा
आतापर्यंत आपण चाय पे चर्चा पाहिली. त्यामध्ये एकाच कपाचे दोन घोट वाटून घेत होते. पण आता ‘होऊ द्या चर्चा’ची वेळ आली आहे. ही ‘मन की बात’ नाही तर ‘जन की बात’ आहे. डबल इंजिन सरकारच्या काळात जनतेला, शेतकऱयांना काय मिळाले याची माहिती चव्हाटय़ावर यावी म्हणून शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. शेतकऱयांच्या बांधावर जा, गावात पारावर, टपरीवर जाऊन त्यांना जन-धन योजनेतून काय मिळाले, पीएम किसान योजनेचा काय लाभ झाला, महिलांना किती योजनांचा लाभ झाला याची चौकशी करा, चर्चा घडवून आणा. लोकांना वस्तुस्थिती सांगा, जुमलेबाज सरकारच्या बोगस कामगिरीचा पर्दाफाश करा, असे निर्देश दिले. सध्या जनतेला सरकारवर विश्वास नाही, पण जाहिरातीवर आहे, कारण त्यांना वाटते सरकार जाहिरात करत आहे म्हणजे मला नाही, पण दुसऱया कोणाला लाभ झाला असे त्यांना वाटते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

जन की बात करा
दुष्काळ, लाठीमार, भाववाढ, गॅस सिलिंडर दोनशेने स्वस्त करण्याचा गोलमाल हे सगळं जे काही चाललेलं आहे हे लोकांमध्ये जाऊन आपल्याला बोलावं लागेल. होऊन जाऊ दे चर्चा… त्यासाठी बॅनर बिनर लावण्याची गरज नाही. ही काही पक्षाची मीटिंग नाही. जशी मन की बात आहे तशी ही जन की बात असली पाहिजे.

आधी कुटुंब सांभाळा मग आमच्या घराण्यावर बोला!
आजही घराणेशाही-घराणेशाही म्हणत जो काही एक उद्घोष चालला आहे… घराणेशाहीच्या आम्ही विरोधात आहोत असं सांगत आहेत. मी तुमच्या घराण्याबद्दल विचारतच नाही. कारण तुम्हाला सांगायला घराण्याचा इतिहासच नाही. जे लोक कुटुंब व्यवस्था नाकारतात त्यांनी दुसऱयाच्या घराणेशाहीवर बोलू नये. त्यांना तो अधिकारच नाही. कुटुंब व्यवस्था, घराणं ही आमच्या हिंदूंची संस्कृती आहे. तिच्या मुळावर तुम्ही घाव घालणार आणि आमच्या घराण्यावर बोलणार? आधी कुटुंब सांभाळा मग आमच्या घराण्यावर बोला, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला हाणला.

एक फुल, दोन हाफला आंदोलकांशी बोलायला वेळ नाही का?
राज्यात सध्या सरकार म्हणजे नेमके कोण आहे, ‘एक फुल, दोन हाफ ना,’ असा सवाल करतानाच त्यांच्याकडे जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱया आंदोलकांशी बोलायला वेळ नाही का, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच ‘इंडिया’ आघाडीवर टीका करण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी प्रेस घेतली होती. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, काल एका ‘उप’ने प्रेस घेतली होती, त्यांच्याकडे टीका करायला वेळ आहे, मग जालना येथील आंदोलकांशी बोलायला वेळ नाही का, असा खडा सवाल त्यांनी केला.

तरीही हा गृहमंत्री कलंक आहे म्हणणार नाही!
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आता सतरंज्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. मी चेष्टा करत नाही. मी टिंगल खरंच करत नाही आणि टोमणा तर अजिबात मारत नाही. मी खरं आज चिडून बोलणार होतो… पुन्हा एकदा कलंक. काल माझ्या माता भगिनींवरती जालन्यात जो अत्याचार झाला आहे ते पाहता राज्यात जो गृहमंत्री आहे तो कलंक नाहीतर दुसरं काय हे मी आज सांगणार होतो, पण आता बोलत नाही… हे सांगण्याचे काम आता तुम्हाला करायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

हुकूमशहाच्या हाती मुंबई जाऊ देणार नाही
वटहुकूम काढून दिल्ली ताब्यात घेतली. आता मुंबई केंद्रशासित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना दोन ते तीनवेळा नीती आयोगासोबत बैठका झाल्या, पण मुंबईचा विकास दिल्लीच्या वाटेने नीती आयोगाच्या माध्यमातून करायचा हा प्रस्ताव तेव्हा आणायची कोणाची हिंमत झाली नव्हती, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांवर हल्ला केला. मिंधे सत्तेचे गुलाम आहेत. त्यांना मुंबईबद्दल प्रेम नाही. जे वरती दोघे बसलेत त्यांना मुंबईची पोटदुखी आहे. मुंबईची ठेव 90 हजार कोटींपर्यंत कशी पोहचली हे त्यांना पचत नाहीय. त्यातून मुंबईची तिजोरी रिकामी करून तिला भिकेला लावायचे आणि आपल्या दारात उभे करून डोक्यावर बसायचे असा डाव आहे, पण कोणी कितीही प्रयत्न करोत, हुकूमशहा येवोत, आम्ही मुंबई कोणाच्या हाती जाऊ देणार नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

हुकूमशाही चिरडून टाकण्यासाठी एकत्र आलोय
सरकार तुमच्या दारी असे सत्ताधारी म्हणत असले तरी खऱया अर्थाने पोलीस तुमच्या घरी आणि आम्ही तुमच्या दारी अशी परिस्थिती आहे. ही हुकूमशाही वृत्ती असून चिरडून टाकण्यासाठीच आम्ही ‘इंडिया’च्या माध्यमातून एकत्र आलो आहे. देश हुकूमशाहच्या घशात जाऊ नये त्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन
इस्रोच्या वैज्ञानिकांनी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 मोहिमेअंतर्गत रॉकेट अवकाशात सोडले आहे. त्याने यशस्वीपणे भरारी घेतली आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच गेल्या सहा दशकांत वैज्ञानिकांनी केलेल्या मेहनतीमुळेच हे यश मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्ष चोरला, चिन्ह चोरले तरीही ठाकरेंनी
मुंबईत ‘इंडिया’ एकत्र करून दाखवला
राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी काहींनी शिवसेना पक्ष फोडला, चिन्ह चोरले, शिवसेनाप्रमुखांचा फोटो चोरण्याचा प्रयत्न करतायत. तरीही ठाकरेंनी मुंबईत ‘इंडिया’ एकत्र करून दाखवला, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, ही माझी ताकद नाही, ही ताकद शिवसैनिकांची आहे. त्यामुळेच हुकूमशाहीविरोधातील आघाडीत शिवसेनेला मानाचे स्थान मिळाले. तसेच सध्या जे कोणी इंडिया आघाडीवर टीका करत आहेत ते भारतविरोधी आहेत. त्यांना थारा देऊ नका, असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले.

पाच साल लूट, दो महिने छूट
केंद्रातील लुटारू सरकारचा कारभार म्हणजे ‘पाच साल लूट, दो महिने छूट’ अशा प्रकारचा आहे. जनता गेल्या आठ-नऊ वर्षांपासून महागाईने पिचली आहे, मात्र सरकारने आता गॅसचे दर कमी केले असून सरकारचा हा निर्णय म्हणजे जुमलेबाजी असून त्यावर ते इमले बांधत आहेत. ते इमले आपल्याला मोडून-तोडून काढायचे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फटकारे

  • ठिगळं जोडलेल्या एनडीएच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक समर्थ आहे. शिवसैनिक एकदा का जिद्दीला पेटला की करून दाखवतोच.
  • तुम्हाला इंडियाच्या विरुद्ध चिरकायला वेळ आहे, पण जालन्यातील आंदोलनकर्त्यांना भेटायला वेळ नाही.
  • भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घर घर मोदी योजनेची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी.
  • भाजप ही भाडय़ाने जमवलेली पार्टी आहे. शिवसेना भाडय़ावर चालत नाही. निष्ठेवर आणि हिमतीवर चालते.
  • प्रधानमंत्री आवास योजना नाही, प्रधानमंत्री आभास योजना सुरू आहे.