वर्ल्ड कपला आता केवळ 14 दिवस उरले आहेत. दहापैकी तीन देशांची संघनिवड अद्याप जाहीर झाली नसली तरी सध्या निवड झालेल्या खेळाडूंमध्ये अफगाणिस्ताननेच बाजी मारली आहे. त्यांच्याच अष्टपैलू मोहम्मद नबी सर्वात वयस्कर खेळाडू असून नूर मोहम्मद हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. अनुभवी आणि वयस्कर खेळाडू पाहता न्यूझीलंड हा संघ सर्वात पुढे असेल आणि त्याच्यापाठोपाठ असेल गतविजेता इंग्लंडचा संघ.
यंदाच्या वर्ल्ड कप हा सर्वाधिक तिशी ओलांडलेल्या खेळाडूंचाच आहे. पण तरीही अफगाणिस्तान संघ सर्वात वेगळा आहे. या संघात 38 वर्षे 257 दिवसांचा मोहम्मद नबी आहे, जो या वर्ल्ड कपमधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तसेच त्यांच्याच संघ असलेला नूर अहमद हा 18 वर्षे 255 दिवसांचा फिरकीवीर विशीच्या आत असलेला एकमेव खेळाडू आहे. त्याचा अपवाद वगळता एकाही संघात इतका तरुण खेळाडू नाही. तसेच सर्वात तरुण संघ म्हणूनही अफगाणिस्तान सर्वात वर आहे. या संघात चक्क 11 खेळाडू 25 वर्षांखालील आहेत. इतका तरुण संघ कोणत्याही देशाचा नाही.
न्यूझीलंड संघ सर्वात अनुभवी
गतवेळी वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठणाऱया चारही संघांनी आपला निम्म्यापेक्षा अधिक संघ 2019 चाच कायम ठेवला आहे. यात हिंदुस्थान, इंग्लंड, न्यूझीलंडसह इंग्लंडचा समावेश आहे. पण यात न्यूझीलंडचा संघ सर्वात अनुभवी आणि वयस्कर म्हणता येईल. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघातील 11 खेळाडू तिशी ओलांडलेले आहेत, मात्र न्यूझीलंडचे चक्क 12 खेळाडू तिशीच्या पुढील आहेत. हिंदुस्थानी संघात तिशी गाठलेले सात जण आहेत. सर्वात तरुण असलेल्या अफगाणिस्तानी संघात केवळ तीन खेळाडूच तिशी गाठलेले आहेत तर इंग्लंडच्या संघातीलही तीन खेळाडू तिशीच्या आतले आहेत. तीन वर्ल्ड कपच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा पात्र ठरलेल्या नेदरलॅण्ड्स संघातही तिशी ओलांडलेल्याच अधिक खेळाडूंचा भरणा आहे.