विज्ञान-रंजन – रेल्वेचा जनक

>> दिलीप जोशी

आज जगभरात सुमारे अकरा लाख किलोमीटर रेल्वे आहे. आपल्या देशातच त्यापैकी सुमारे सत्तर हजार किलोमीटर असून मुंबईची ‘लाइफलाइन’ समजली जाणारी लोकल दोनशे पंचाऐंशी किलोमीटर धावते. आता त्यात भुयारी रेल्वे, राज्यात आणि देशात तसंच इतरत्र जगात रेल्वेचं जाळं वाढतच आहे. संशोधनाची गती ‘हायपरलूप’सारख्या तंत्रज्ञानापर्यंत पोहोचली असली तरी अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातही त्याचे प्रयोगच सुरू आहेत. खर्चाच्या दृष्टीने त्यापेक्षा कदाचित विमान प्रवास स्वस्त पडेल, पण कालांतराने पृथ्वीवरचे पेट्रोलचे साठे संपले की वेगळय़ा, परंतु वेगवान पर्यायांकडे वळावंच लागेल. कारण वैज्ञानिक प्रगतीमध्ये माघार घेता येत नाही. तशा नवनव्या शक्यता निर्माण होतील.

कोणास ठाऊक अंतराळात सौर ऊर्जा ‘पकडून’ ती विद्युत लहरींच्या स्वरूपात पृथ्वीवर पाठविण्याचे प्रयोग किफायतशीर ठरले तर कोणत्याही हवामानात ‘क्लीन एनर्जी’ मिळू शकेल. अशा ‘जर-तर’च्या वैज्ञानिक संकल्पनाच नव्या संशोधनाला चालना देत असतात. त्यामध्ये वेळावेळी सुधारणा होते. कारण विज्ञान स्थितीवादी नव्हे, तर गतीवादी असतं. अर्थात पृथ्वीवरचं सर्व सृष्टिवैभव, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण या सर्वांच्या सुरक्षेचा विचार करूनच वैज्ञानिक संशोधनांचा वापर व्हायला हवा, नाहीतर रेफ्रिजरेटर, एसी, पेट्रोल, रसायनं यांनी झालेल्या अमर्याद प्रदूषणामुळे आता जो त्रास होतोय तो वाढत जाईल. सुखाचा ध्यास घेताना श्वासच काsंडला जाणार नाही ना? याचा विचार आणि कृती आज घडली नाही, तर केवळ गतीचा हव्यास आपली काय गती करेल त्याची कल्पनाच नको.

परंतु जग ‘जवळ’ आणण्यातला रेल्वेचा वाटा मोलाचा आहे हे कुणीही मान्य करेल. साधी गोष्ट, 1857 मध्ये वरसईच्या गोडसे भटजींना मुंबईहून पुण्याला जायला मजल दरमजल करत दोन-तीन दिवस लागले होते (त्यांचं ‘माझा प्रवास’ हे पुस्तक जरूर वाचा). मात्र त्यांच्याच हयातीत 1865 पासून पुण्याला चार तासांत नेणारी ट्रेन सुरू झाली. बैलगाडीने पाच-सात दिवस लावणारा प्रवास सात-आठ तासांत ते अंतर पार करू लागला.

जगातल्या पहिल्या रेल्वेच्या आरंभानंतर हिंदुस्थानात अवघ्या 30 वर्षांत रेल्वेने मुंबई ते पुणे गाठले होते. ही त्या काळाच्या मानाने वेगात झालेली प्रवासक्रांती होती. जगातली पहिलीवहिली प्रवासी ट्रेन मात्र 27 सप्टेंबर 1825 रोजी लंडनमध्ये स्टॉकटन ते डार्लिंगटन अशा नऊ किलोमीटर मार्गावर धावली. प्रवासी रेल्वेचे ‘जनक’ मानले जाणारे जॉर्ज स्टीफन्सन स्वतः वाफेचे इंजिन चालवत होते आणि त्यांचा तरुण मुलगा रॉबर्ट त्यांना सहाय्य करत होता.

या पहिल्या ट्रेनमध्ये माणसं मोजकीच आणि मालाचे डबे जास्त होते, पण लोकांचे कुतूहल फारच शिगेला पोहोचलं होते. स्टीफन्सन यांनी दोन रुळांतली रुंदी 1.435 मीटर (4 फूट साडेआठ इंच) इतकी ठरवली होती. पुढे हेच गेज परिमाण त्यांच्या नावे प्रसिद्ध झाले. आताची आपली ब्रॉड गेज रेल्वे 1.376, मीटर गेज 1 मीटर आणि नॅरो गेज 67 सें.मी. इतक्या अंतरावरील समांतर रुळांवरच धावते.

यशाचा हा ‘प्रवास’ जॉर्ज स्टीफन्सन यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. वडील अग्निशमन दलात काम करत होते, पण पगारात घरच चालत नव्हतं, तर मुलांचं शिक्षण कुठलं! बरं, शिक्षणाचा प्रसार अठराव्या शतकातल्या ग्रामीण इंग्लंडमध्येही बेताचाच होता. शाळेत जायची ऐपत नसल्याने कळत्या वयात पडेल ते काम करून वडिलांच्या प्रपंचाला मदत करणे हेच जॉर्जचे यांचे कर्तव्य बनले आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे पार पाडले. चपला शिवणं, घडय़ाळ दुरुस्ती करणे अशा कामांतून त्यांना चार पैसे मिळत. त्यामुळे हा महान शास्त्र्ाज्ञ वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत निरक्षर राहिला.

नंतर नोकरीसाठी स्कॉटलॅण्डला गेल्यावर त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजलं आणि अठराव्या वर्षी जॉर्ज दिवसा काम करून रात्रशाळेत शिकायला लागले. ज्ञानाची ओढ अनिवार होती, पण पुन्हा परिस्थितीने फटका दिला. एका सुरुंग स्पह्टात त्यांच्या वडिलांची दृष्टी गेली आणि जॉर्ज यांना पुन्हा घरची जबाबदारी घ्यावी लागली. वडिलांना झालेला हा अपघात खाणीतल्या मेणबत्तीने घडवला असावा. त्यामुळे जॉर्ज यांनी खाण कामगारांसाठी ‘सेफ्टी लॅम्प’ बनवायचं ठरवलं आणि बाहेरून बारीक जाळी असलेला सुरक्षा दीप (सेफ्टी लॅम्प) तयार केला. त्याच वेळी हम्फ्री डेव्ही हेसुद्धा असा दिवा बनवण्याच्या खटपटीत होते. जॉर्जसारख्या ‘गावठी’ माणसाने तो आधीच बनवावा हे त्यांच्या शिष्ट शहरी मनाला रुचलं नाही. त्यामुळे स्टीफन्सन यांचा ‘सेफ्टी लॅम्प’ फक्त ईशान्य इंग्लंडमध्ये वापरात आला.

आपल्या इंग्लिशचे उच्चार नॉर्थ हॅम्बरलॅण्डचे असल्याने ते ‘लँग्वेज पार्लमेंट’सारखे उच्चभ्रू नाहीत याची खंत जॉर्ज स्टीफन्सन यांना होती. म्हणून पैसे मिळवून त्यांनी मुलगा रॉबर्ट याला उत्तम आणि तथाकथित ‘उच्चभ्रू’ इंग्लिश बोलणाऱयांच्या शाळेत घातलं. हम्फ्रीकडून तर ‘सेफ्टी लॅम्प’ची कल्पना आपल्याकडूनच स्टीफन्सन यांनी घेतली असावी अशी शंकाही व्यक्त केली. स्टीफन्सन शांतपणे आपले काम करत राहिले. त्यांच्या कीर्तीचा ‘बाष्प-रथ’ रुळांवरून धावायचा होता. त्यासाठी सुशिक्षित मुलाच्या सहाय्याने त्यांनी (मुलाच्याच नावे) पंपनी स्थापन केली. 1830 मध्ये त्यांच्या पंपनीची ट्रेन अनेक मातब्बरांना घेऊन कशी धावली ते पुढच्या लेखात.