निराधारांच्या आधारासाठी…

>>अनघा सावंत

‘निराधार लोकांच्या आधारासाठी’ हे बोधवाक्य अंगीकारत कार्य करणारी संस्था म्हणजे ठाणे येथील हेल्पिंग हँड सामाजिक संस्था. ही संस्था गेली 7 वर्षे गोरगरीब, गरजू तसेच बेघर, बेवारस नागरिकांसाठी महत्त्वाचे कार्य करत आहे.
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा गोरगरीब, गरजू नागरिकांना मिळवून देणे या उद्देशाने सचिन राऊत यांनी या संस्थेची स्थापना केली. संस्था 2018 मध्ये नोंदणीकृत झाली असली तरी संस्थेचे कार्य 2017 पासूनच सातत्याने सुरू होते. स्थापनेच्या सुरुवातीपासूनच संस्थेच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन अनेक जण मदतीसाठी पुढे येऊ लागले, असे सचिन यांनी सांगितले.

गेली पाच वर्षे संस्थेच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि सर्व नागरिकांच्या सहकार्याने ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम जागोजागी राबविण्यात येतो. या उपक्रमाद्वारे नागरिक वापरलेल्या, परंतु उत्तम स्थितीतील सर्व प्रकारच्या वस्तू माणुसकीच्या भिंतीवर ठेऊन जातात. संस्थेने भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत ही सर्व जमा झालेली मदत एकत्रित करून ठेवण्यात येते. त्यानंतर संस्था आठवडय़ाला त्या सर्व वस्तूंचे वर्गीकरण करून गोरगरीब वस्ती तसेच आदिवासी वाडी/वस्तीमध्ये त्याचे वाटप करते. या माध्यमातून आतापर्यंत बऱयाच शाळांना तसेच वाडी-वस्तींना मदत झालेली आहे. जागेचे भाडे संस्थेचे कार्यकर्ते मिळून देतात, तर काही नागरिकही दर महिन्याला उपक्रमाला हातभार लावतात.

संस्था रस्त्यावरील बेघर, बेवारस, ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात नेऊन, त्यांच्यावर उपचार करून आणि त्यांना निवारा केंद्रात प्रवेश देऊन एक नवीन आयुष्य मिळवून देते. लॉकडाऊनमध्ये संस्थेच्या वतीने कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गरजूंना सहा महिने दररोज 150 कंटेनर जेवणाचे रोज वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे हे जेवण कार्यकर्ते स्वतःच बनवत होते. या काळात अनेक होम क्वारंटाइन लोकांना घरोघरी डबे पोहचविण्याचे मोलाचे कार्यही संस्थेने केले. तसेच बेवारस मृतदेहांना उचलून स्मशानात नेण्याचे काम संस्थेने केले.

वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी ‘वीटभट्टीवरची शाळा’ हा उपक्रम संस्था राबवते. आदिवासी वाडी-वस्तीमध्ये वैद्यकीय शिबीर भरवते, गतिमंद नागरिकांना व्हीलचेअर आणि वॉकरचे वाटप करते. दरवर्षी घटस्थापनेनिमित्ताने आदिवासी वाडी-वस्तीमधील माय-भगिनींना संस्था मदतीचा हात देते. या महिलांना नवी कोरी साडी देऊन त्यांचा मानसन्मान करते तसेच धान्य वाटपही करते.