वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड प्रकल्पासाठी कंत्राटदार निश्चित; पालिका खर्च करणार 18 हजार कोटी

मुंबईला वेगवान बनवणाऱया मरीन ड्राइव्ह ते वरळी कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आले असताना आता वर्सोवा ते दहिसर या 18.47 किमीच्या कोस्टल रोडसाठी पालिकेने कंत्राटदार निश्चित केला आहे. या मार्गासाठी पालिका 18 हजार कोटींचा खर्च करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी आज दिली.

मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मरीन ड्राइव्ह ते कांदिवली या सुमारे 35 किमी अंतरात कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. यातील मरीन ड्राइव्ह ते वरळी प्रकल्पाचा सुमारे 10.58 किमीचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या दिशेने असून वांद्रे ते वर्सेवा प्रकल्पाचे काम एमएसआरडीसी करत असून पालिका वर्सेवा ते दहिसर या टप्प्याचे काम करणार आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने चार कंत्राटदारांची निवड केली आहे. एकूण सहा पॅकेजमध्ये हे काम चालणार असून पुढील चार वर्षांत म्हणजे सन 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेले वर्सेवा-दहिसर हे दुसऱया टप्प्यातील काम नवीन वर्षात सुरू होणार असून हा मार्ग गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडला जाणार असल्याने पूर्व-पश्चिम उपनगरे जवळ येणार आहेत.