दीड दिवसांच्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा भावपूर्ण निरोप देत बुधवारी दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण करत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील 6 हजार 960 गणेश मूर्तींचे समुद्र किनारी, चौपाटी आणि कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्ती विसर्जनाच्या संख्येत वाढ झाली.

गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, जुहू, वेसावे, अक्सा बीच अशा विविध विसर्जनस्थळी दुपारनंतर दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरगुती 6 हजार 930 तर सार्वजनिक 30 गणपतींचे विसर्जन विविध चौपाटय़ांवर करण्यात आले. फक्त कुत्रिम तलावात सार्वजनिक 14, घरगुती 2 हजार 819 अशा एकूण 6 हजार 960 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

खबरदारी घ्या! चौपाटय़ांवर ‘स्टिंग रे’, ‘जेलीफिश’चा धोका

गणेश विसर्जनासाठी समुद्रकिनारी किंवा पाण्यात उतरताना स्टिंग रे आणि जेलीफिशचा धोका होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी घ्या, असे आवाहन मुंबई महापालिकेने भाविकांना केले आहे.

मुंबईच्या समुद्रकिनारी ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान ‘स्टिंग रे’, ‘ब्लू बटन जेलीफिश’ मोठय़ा प्रमाणात आढळतात. त्यामुळे गणेश मूर्ती विसर्जनावेळी भक्तांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. त्याचबरोबर विसर्जनस्थळी समन्वयाने कार्यवाही करावी असे निर्देश ‘डी’, ‘जी-उत्तर’, ‘के-पश्चिम’, ‘पी-उत्तर’ आणि ‘आर-मध्य’ या विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.

वैद्यकीय कक्ष सज्ज 

स्टिंग रे, जेलीफिशने दंश केल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे तसेच एक 108 रुग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

गौराईंचे आज आगमन

गणपती आगमनानंतर वेध लागतात ते गौराईचे. उद्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करण्यात येणार आहे. घरोघरी गौराईचे स्वागत केले जाणार आहे. गौरी आवाहन सूर्योदयापासून दुपारी 3.35पर्यंत करावे, असे ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते यांनी सांगितले. दुसऱया दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन केले जाते. या दिवशी संध्याकाळी हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो. देवीला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तिसऱया दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते. गौरी विसर्जन सूर्योदयापासून दुपारी 2.56पर्यंत करावे. अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून दिवसभर ठेवून दुसऱया दिवशी खाण्याची प्रथा आहे; पण ताट तसेच ठेवून दुसऱया दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो, असे मोहन दाते यांनी सांगितले.