चौकशी अहवाल मुदतीत सादर केला

जिल्हा रुग्णालय आग प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल मुदतीत राज्य सरकारकडे सादर केला असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा चौकशी समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी दिली. दरम्यान, या घटनेतील दोषींवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देऊन यातील दोषींवर कडक कारवाई होईल, असे ठामपणे सांगितले होते. राज्य शासनाने आगीच्या चौकशीसाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. या चौकशी समितीला सात दिवसांचा अवधी देण्यात आला होता. मात्र, घटना घडून 54 दिवसांचा कालावधी लोटला आहे. विभागीय आयुक्त गमे बुधवारी (दि. 29) नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनास आले होते. त्यावेळी त्यांनी, ‘आग प्रकरणाचा अहवाल मुदतीच्या आत शासनाला पाठविला आहे. शासन स्तरावर याबाबत निर्णय घेतला जाईल,’ असे सांगितले. पुढील कारवाईबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगत त्यांनी हात झटकले. चौकशी अहवाल शासनाला पाठवला असेल तर याबाबत 54 दिवस उलटूनही प्रसारमाध्यमांना का सांगण्यात आले नाही? अद्यापि शासनाने दोषींवर कारवाई का केली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.