सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्धार, कोणत्याही राजकीय व्यासपीठावर जाणार नाही

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून दोन असे एकूण अडीच हजार उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबरोबरच यापुढे कोणत्याही राजकीय व्यासपीठावर न जाण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बीड येथे राजलक्ष्मी हॉटेलमध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते कोणत्याही राजकीय व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार उभे करण्याचाही निर्णय घेण्यात आला. जिल्हाभरातून जवळपास अडीच हजार उमेदवार मराठा समाजाकडून उभे राहतील, अशी रणनीती आखण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी सरसकट कुणबी प्रमाणपत्र, पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण, सगेसोयर्‍यांचा कायदा तात्काळ करणे आदी मागण्याही करण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. कुणबी नोंदी शोधणारे संतोष यादव यांचेही या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला.