पोलिसांविरुद्ध तक्रार करणाऱ्या याचिकाकर्त्या वकिलांना धमकी’, मुंबई उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

mumbai-highcourt

अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांविरुद्ध तक्रार करणाऱया याचिकाकर्त्या वकिलांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही बाब सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याची गंभीर दखल न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने घेतली. यावेळी याचिकाकर्त्या वकिलांना धमकीबाबत माटुंगा विभागाच्या एसीपींकडे तक्रार करण्यास सांगतानाच, त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन पुढील कारवाई करा, असे निर्देश खंडपीठाने एसीपींना दिले. याप्रकरणी 19 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.

18 मे रोजी अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांनी आम्हाला मारहाण केली, असा आरोप साधना यादव आणि हरिकेश मिश्रा या दोन वकिलांनी केला आहे. कथित मारहाणीप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासिर कुलकर्णी व इतर पोलीस कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना निर्देश द्या, अशी विनंती करीत वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी खंडपीठाने मारहाणीसंदर्भातील तक्रार माटुंगा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिसांनी त्या आदेशाचे पालन केले नाही. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत अँटॉप हिल पोलीस ठाण्यातच जामीनपात्र कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन्ही वकिलांना याचिका मागे घेण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीमार्फत ठार मारण्याची धमकीही देण्यात आली, असे सोमवारी याचिकाकर्त्यांतर्फे खंडपीठाला कळवण्यात आले. यासंदर्भात याचिकाकर्त्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने न्यायालयात हजर राहिलेल्या माटुंगा विभागाच्या एसीपींना धारेवर धरले. मारहाण आणि धमकीबाबत वकिलांनी दिलेल्या तक्रारीवर गांभीर्याने कारवाई करा, अशी ताकीद खंडपीठाने माटुंगा एसीपींना दिली आणि सुनावणी तहकूब केली.