मोदींचे विकसित हिंदुस्थानचे स्वप्न तद्दन मूर्खपणाचे! रघुराम राजन यांची जबरी टीका

अर्थव्यवस्था मजबूत असल्याच्या बडेजावी प्रचाराला भुलू नका!

हिंदुस्थानचा आर्थिक विकास वेगाने होत आहे असे भासवून त्याची मोठय़ा प्रमाणात जाहिरात केली जात आहे. ही जाहिरात करून हिंदुस्थान घोडचूक करत आहे. सर्वात आधी आर्थिक अंगाने ज्या मूलभूत समस्या आहेत त्यावर मात करावी लागेल मगच हिंदुस्थान शाश्वत विकासाच्या दृष्टीने पुढे जाऊ शकेल.

हिंदुस्थान 2047 पर्यंत विकसित देश बनेल, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देशवासीयांना दाखवत असतानाच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी हा दावा म्हणजे तद्दन मूर्खपणा असल्याचे परखड मत नोंदवले आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याच्या बडेजावी प्रचाराला भुलू नका अशा शब्दांत देशवासीयांना सावध करतानाच, लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेत येणाऱ्या सरकारपुढे असलेल्या आव्हानांकडेही राजन यांनी लक्ष वेधले.

रघुराम राजन यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारच्या आर्थिक हेराफेरीचा खरपूस समाचार घेतला. हिंदुस्थानने अर्थव्यवस्थेच्या अवाजवी प्रसिद्धीवर जो विश्वास टाकला आहे ती चिंतेची बाब आहे, असे रघुराम राजन म्हणाले. राज्यकर्ते अर्थव्यवस्थेबाबत काहीही दावा करत असले तरी त्यावर सामान्य नागरिकांनी डोळे झाकून विश्वास ठेवणे ही सर्वात मोठी चूक ठरेल, असे राजन यांनी सांगितले. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम घ्यावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले.

  2047 पर्यंत हिंदुस्थान विकसित देश होईल या मोदींच्या दाव्याबाबत विचारले असता, हा दावा मूर्खपणाचा आहे, अशी टीका राजन यांनी केली. सरासरी सर्व मुले माध्यमिक शिक्षण मिळवू शकत नसतील. शाळा अर्ध्यावर सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण अधिक असेल तर असे दावे तुम्ही कोणत्या आधारावर करता, असा प्रश्न राजन यांनी विचारला. आपल्याकडे मनुष्यबळ मोठे आहे, मात्र या मनुष्यबळाचा योग्य उपयोग आवश्यक आहे. त्यासाठी कुशल कामगारांची निर्मिती आणि त्याच प्रमाणात नोकऱ्याही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे राजन म्हणाले.

कोरोनानंतर साक्षरतेबाबत आलेल्या अहवालांचा दाखला देत राजन यांनी घसरलेल्या शैक्षणिक दर्जावर बोट ठेवले. शालेय विद्यार्थ्यांची क्षमता 2012 आधीच्या स्तरावर पोहचली आहे. तिसऱ्या इयत्तेतील 20.05 टक्के विद्यार्थ्यांना वाचताही येत नाही आणि दुसऱ्या इयत्तेतील मुलांना तर लिहिताही येत नाही. आशियातील व्हिएतनामसारख्या देशापेक्षाही हिंदुस्थानचा साक्षरता दर कमी आहे. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे, असे राजन म्हणाले.

मांजर काळे की पांढरे…

हिंदुस्थानची वाटचाल, दृष्टिकोन व्यावहारिक हवा हे सांगताना डॉ. रघुराम राजन यांनी आधुनिक चीनचे शिल्पकार डेंग झिआओपिंग यांच्या प्रसिद्ध कोटचा दाखला दिला. ‘मांजर काळे की पांढरे हे महत्त्वाचे नाही. ते उंदीर पकडते का?’ हे पाहणे महत्त्वाचे आहे.

उच्च शिक्षणापेक्षा सेमीकंडक्टरसाठी पैसा

मोदी सरकार हाय-प्रोफाइल प्रकल्पांना झुकते माप देत आहे. उच्च शिक्षणासाठी 476 अब्ज रुपये तर सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्र स्थापन करण्यासाठी 760 अब्ज रुपयांची तरतूद केली आहे, असे नमूद करत सरकारने चिप उत्पादनापेक्षा उच्च शिक्षणावर अधिक खर्च करण्याची गरज आहे. म्हणजे सेमीकंडक्टरच्या व्यवसायासाठी चांगले अभियंते आपल्याला मिळू शकतील, अशा शब्दांत राजन यांनी सरकारचे कान टोचले.

विकसित हिंदुस्थानबाबत केल्या जाणाऱ्या प्रचारावर अजिबात विश्वास ठेवू नका. हे ध्येय गाठण्यासाठी, स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आपल्याला आणखी पैक वर्षे कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी राज्यकर्ते आभास निर्माण करत आहेत. हे वेळीच ओळखा.
रघुराम राजन