अभिनेते शरद पोंक्षेंचे एक पाऊल मागे, नव्या नाटकाच्या नावात बदल करणार

‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावरून सुरू झालेल्या वादाची गुरुवारी उच्च न्यायालयात दुसरी घंटा वाजली. मूळ ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी ट्रेडमार्क आणि कॉपीराईट उल्लंघनाच्या मुद्द्यावर अभिनेते शरद पोंक्षे यांना न्यायालयात खेचले आहे. याबाबत गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी पोंक्षे यांनी एक पाऊल मागे घेतले. नव्या नाटकाच्या नावात ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल करणार असल्याचे पोंक्षेंनी न्यायालयात सांगितले. त्यासाठी वेळ देत न्यायालयाने सुनावणी २७ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

माऊली भगवती प्रॉडक्शन्सच्या ‘नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकावरून निर्माण झालेला वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या नव्या नाटकातील संहिता, सादरीकरण तसेच ट्रेडमार्कचे आमच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकाशी साधर्म्य आहे. त्यामुळे आमच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करीत माऊली प्रॉडक्शन्सचे मालक व निर्माते उदय धुरत यांनी माऊली भगवती प्रॉडक्शन्सचे मालक प्रमोद धुरत व अभिनेते शरद पोंक्षे यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. याप्रकरणी गुरुवारी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्यापुढे झालेल्या सुनावणीवेळी उदय धुरत यांच्यातर्फे अॅड. हिरेन कमोद व अॅड. महेश म्हाडगुत यांनी, तर प्रतिवादींतर्फे अॅड. रशमीन खांडेकर यांनी बाजू मांडली.

माऊली भगवती प्रॉडक्शनने ट्रेडमार्क आणि कॉपीराईट कायद्याचे सरळसरळ उल्लंघन करून नवे ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगभूमीवर आणल्याचा जोरदार युक्तिवाद अॅड. कमोद यांनी केला. त्यावर हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे म्हणणे प्रतिवादी माऊली भगवती प्रॉडक्शन आणि शरद पोंक्षेंतर्फे अॅड. खांडेकर यांनी मांडले. याचवेळी पोंक्षे यांनी नवीन नाटकाच्या नावात ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल करणार असल्याची तयारी दर्शवली. याबाबत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे अर्ज करण्यासाठी न्यायालयाने दोन दिवसांचा वेळ दिला. तसेच त्यांच्या अर्जावर २५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश संबंधित मंडळाला दिले. याप्रकरणी २७ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी न्यायालय काॅपीराईटच्या मुद्द्यावर युक्तिवाद ऐकून घेणार आहे. त्यावर पोंक्षेंच्या नाटकाचे भवितव्य ठरणार असल्यामुळे सुनावणीकडे संपूर्ण रंगभूमीचे लक्ष लागले आहे.

मूळ नाटकाशी साधर्म्य; रेकॉर्डिंगच्या आधारे दावा

शरद पोंक्षेंनी मूळ ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पूर्णपणे हायजॅक केले आहे, असा दावा याचिकाकर्त्या उदय धुरत यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने मागील सुनावणीवेळी दिलेल्या परवानगीनुसार नाटकाच्या प्रयोगाचे रेकॉर्डिंग केले. त्यात नव्या नाटकाची संहिता आणि सादरीकरणाचे मूळ नाटकाशी साधर्म्य असल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आणून देण्यात आले.

नाटकाच्या वादात नथुराम गोडसेंच्या नातवाची उडी

सुनावणीवेळी नथुराम गोडसे यांचे नातू गोपाळ गोडसे यांनी अॅड. उदय वारुंजीकर आणि अॅड. सिद्धेश पिळणकर यांच्यामार्फत हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यावर काॅपीराईटच्या वादात आपला संबंध काय, अशी विचारणा न्यायमूर्ती छागला यांनी केली. तसेच गोडसे कुटुंबियांचे म्हणणे पुढील सुनावणीवेळी ऐकून घेतले जाईल, असे न्यायालयाने नमूद केले.