कितीही झाकले तरी रेल्वेचे वाटोळे मोदी सरकार लपवू शकत नाही; राहुल गांधी यांचे जोरदार टीकास्त्र

कितीही झाकायचा प्रयत्न केला, मोठय़ा गमजा मारल्या तरी मोदी सरकारच्या काळात भारतीय रेल्वेचे जे काही वाटोळे झाले आहे ते लपवता येणार नाही, असे जोरदार टीकास्त्र आज राहुल गांधी यांनी सोडले.

केवळ श्रीमंतांना डोळय़ासमोर ठेवून रेल्वेत जी काही धोरणे आखली गेली त्यामुळे या राष्ट्रीय वाहतूक सेवेची दुर्दशा झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास हा विश्वासघाताची हमी असल्याचा दावाही गांधी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये केला. ‘हवाई चप्पल’ घालणाऱयांना विमान प्रवासाचे स्वप्न दाखवून पंतप्रधान मोदी त्यांना गरीबांचे वाहन असलेल्या रेल्वेपासून दूर करत आहेत, असे त्यांनी हिंदी भाषेत केलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिकांची लूट
सरकारने गेल्या तीन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलती काढून घेऊन त्यांच्याकडून 3,700 कोटी रुपये गोळा केले आहेत, असा दावा त्यांनी केला. प्रसिद्धीसाठी निवडलेल्या ट्रेनला प्राधान्य देण्यासाठी सामान्य लोकांच्या गाडय़ा कमी केल्या जातात. एसी कोचची संख्या वाढवण्यासाठी जनरल डब्यांची संख्या कमी केली जात आहे. रेल्वेची धोरणे केवळ श्रीमंतांना डोळय़ासमोर ठेवून तयार केली जात आहेत आणि त्यावर अवलंबून असलेल्या भारताच्या 80 टक्के लोकांचा हा ‘विश्वासघात’ आहे, असे ते म्हणाले.