समलिंगींबाबत पोलिसांचे वर्तन चांगले हवे, हायकोर्टाचे निरीक्षण; मार्गदर्शक सूचना करणार जारी

समलिंगींची प्रकरणे हाताळताना पोलिसांचे वर्तन चांगले हवे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. समलिंगींची प्रकरणे पोलिसांनी कशी हाताळावीत यासाठी आम्ही मार्गदर्शक सूचना जारी करू, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. समलिंगींचे प्रकरण पोलिसांनी कसे हाताळावे यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने विविध आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार महाराष्ट्रातही काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत की नाहीत हे राज्य शासनाने तपासून घ्यावे. कारण समलिंगींचे एखादे प्रकरण आले तर पोलिसांनी त्यांना चांगली वागणूक द्यायला हवी. अशी प्रकरणे हाताळताना पोलिसांचे वर्तन चांगलेच हवे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

महाराष्ट्रातील एका मुलीची शेजारच्या राज्यातील एका मुलीसोबत सोशल मीडियावर मैत्री झाली. पुढे त्यांची मैत्री अधिकच घनिष्ठ झाली. एक दिवशी शेजारच्या राज्यातील मुलगी घर सोडून महाराष्ट्रात आली आणि मैत्रिणीसोबत राहू लागली. तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हते. तिचे कुंटुब महाराष्ट्रात आले व तिला परत घेऊन गेले. काही दिवसांनी ती पुन्हा महाराष्ट्रात आली. यावेळी मात्र तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे या दोन्ही मुलींनी न्यायालयात धाव घेतली होती.