जुन्या डबलडेकरचे होणार ‘जतन’

मुंबईची शान म्हणून बेस्टच्या ताफ्यातील जुनी डबलडेकर ताफ्यातून निवृत्त झाली असली तरी तिची आठवण मुंबईकरांच्या मनात कोरली गेलेली आहे. त्यामुळेच जुन्या डबलडेकर बसेसचा लाल रंग, मार्ग व रुट दर्शवणारे ब्लॅक अँड व्हाईट फलक, बसमध्ये मागून चढा अन् मागून उतरा, अशी विविध वैशिष्टय़ असलेल्या एका डबलडेकर बसचे जतन करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी दिली. बेस्ट उपक्रमाच्या डबल डेकर बसला ऐतिहासिक ओळख आहे. 8 डिसेंबर 1937 साली पहिली दुमजली बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली होती. देशभरात केवळ मुंबईच्या रस्त्यांवरून डबल डेकर बसेस धावतात. या बसमधून एकदा तरी प्रवास करायचा अशी प्रत्येकाची खासकरून बच्चे कंपनीची इच्छा होती. मुंबईची शान म्हणून या बसला नेहमीच मुंबईकरांची गर्दी असते. 15 सप्टेंबरला अंधेरी आगारातील ही बस, आगरकर चौक ते सिप्स या 415 क्रमांकाच्या मार्गावर शुक्रवारी रात्री धावली, ती अखेरची अन् शेवटची फेरी होती.