भाजपला लडाखची जमीन अदानींच्या घशात घालायचीय, राहुल गांधी यांचा घणाघात

भाजपला लडाखमधील जमीन बळकावून अदानींच्या घशात घालायची आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. चीनने येथील जमिनी बळकावल्या नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे सांगत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी हे सध्या लडाख दौऱयावर असून शुक्रवार हा त्यांचा या दौऱयाचा शेवटचा दिवस होता. कारगीलमधील सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर तोफ डागली.

लडाखमधील लोकांना प्रतिनिधित्व दिले तर त्यांच्या जमिनी बळकावता येणार नाहीत हे भाजपला माहीत आहे. त्यामुळे त्यांना तुम्हाला प्रतिनिधित्व द्यायचे नाही. तुमच्या जमिनी बळकावून भाजपला त्या अदानीला द्यायच्या आहेत. कारण अदानीला येथे मोठमोठे कारखाने उभारायचे आहेत, परंतु आम्ही असे होऊ देणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला. लडाखच्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने घुसखोरी केली नसल्याचे खोटे सांगितले. कारगील ही रणभूमी असून चीनच्या घुसखोरीविरोधात येथील नागरिक ठामपणे उभे राहिल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

लडाख बेरोजगारीचे केंद्र

कारगील डेमोव्रेटिक अलायन्सने लडाखवासीयांच्या मागण्या मांडल्या असून त्याबद्दल संसदेत आवाज उठवणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. लडाखला पेंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर येथील नागरिकांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले गेले नाही हा पहिला प्रश्न आहे, तर लडाख हे बेरोजगारीचे पेंद्र बनले आहे ही दुसरी मोठी समस्या असल्याचे राहुल गांधी म्हणाले. येथे विमानतळ नाही, कनेक्टिव्हिटी नाही ही तिसरी मोठी समस्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान

काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत पायी चाललो होतो. त्याला ‘भारत जोडो यात्रा’ असे संबोधले गेले. देशात भाजपा आणि आरएसएसने पसरवलेला द्वेष आणि हिंसेविरोधात ठामपणे उभे राहणे हाच या ‘भारत जोडो यात्रे’चा हेतू होता, असे राहुल गांधी म्हणाले. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडणे हाच यात्रेमधील संदेश होता. गेल्या काही दिवसांत मला स्वतःला हे दिसले. त्यावेळी प्रचंड थंडी आणि बर्फवृष्टीमुळे लडाखला जाऊ शकलो नाही. त्यामुळे यावेळी हीच ‘भारत जोडो यात्रा’ बाइकवरून लडाख दौऱयाच्या रूपाने पुढे नेल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

हिंदुस्थानात मुसलमानांवर हल्ले होत आहेत ही तक्रार चुकीची नाही, पण तुम्ही हेदेखील समजून घेतले पाहिजे की, इथे मणिपूर चार महिन्यांपासून जळत आहे. केवळ मुसलमानांवर हल्ले होत आहेत असा विचार करू नका. इथे अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासींवरही हल्ले होत आहेत हे लक्षात घ्या.