खेड येथील हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड, चौघेजण ताब्यात; साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड तालुक्यातील मौजे कुळवंडी, देऊळवाडी येथील जंगलमय परिसरात सुरु असलेल्या हातभट्टी दारुधंद्यावर खेड पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून 6 लाख 60 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये अवैध दारुधंद्यावर छापे घालण्याचे आदेश दिले होते. गुन्हे प्रतिबंधक गुन्हे तपास आणि अवैध धंद्यांविरुध्द चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांना बक्षिस योजना सुरु केलो आहे. खेड परिसरातील दारु धंद्याचा शोध उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांनी घेतला. कुळवंडी देऊळवाडी येथील एक किलोमीटरच्या परिसरातील जंगलमय भागात ओढ्याजवळ सुरु असलेल्या दारुधंद्यावर पोलिसांनी धाड टाकली.

पोलिसांनी चार इसमांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे मंगेश दगडू निकम, सुरेश रामाजी निकम, संतोष निकम, अशोक निकम अशी आहेत. त्याठिकाणी दारूसाठा, गुळ, नवसागर, हातभट्टी आणि दारु असा एकूण 6 लाख 60 हजार 870 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर, पोलीस निरिक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरिक्षक सुजीत सोनवणे, दिलीप गोरे, महेंद्र केतकर, दिनेश पोटकर, विक्रम भुरुणकर, विनय पाटील, रमेश बांगर, लतिका मोरे, रुपेश जोशी, अजय कडू, राहूल कोरे, कृष्णा बांगर आणि जोशी यांनी केली.