अदानी हटाव, धारावी बचाव, शनिवारी शिवसेनेची धडक; प्रचंड मोर्चात हजारो धारावीकर सहभागी होणार

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव ‘मिंधे’ सरकारने आखला आहे. या पुनर्विकासात धारावीकरांवर प्रचंड अन्याय झाल्यामुळे आतापर्यंत अनेक आंदोलनेही करण्यात आली. मात्र धारावीकरांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न सरकार आणि ‘अदानी’कडून सुरू आहेत. याचा तीव्र निषेध करीत धारावीकरांच्या हक्कांसाठी 16 डिसेंबर रोजी शिवसेनेचा मोर्चा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘अदानी’च्या ‘बीकेसी’तील कार्यालयावर धडवणार आहे. या मोर्चाला तातडीने परवानगी द्यावी यासाठी शिवसेनेकडून धारावी पोलीस ठाण्याकडे आज अर्ज सादर करण्यात आला आहे.

धारावीच्या पुनर्विकासाचे काम राज्य सरकारने ‘अदानी’ समूहाला दिले आहे. याबाबत सरकारने अधिकृतरीत्या शासन निर्णयही जारी केला आहे. मात्र या पुनर्विकासात भूमिपुत्र असलेल्या धारावीकरांना विश्वासात घेतलेले नाही. शिवाय या पुनर्विकासात धारावीकरांवर प्रचंड अन्याय झाला आहे. त्यामुळे धारावीकरांनी अन्यायाविरोधात आंदोलने करूनही सरकार पिंवा ‘अदानी’कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे धारावीकरांच्या हक्कासाठी आता शिवसेना मैदानात उतरली आहे.

‘अदानी’ला धारावी बळकावू देणार नाही

‘टीडीआर’ची सक्ती असेल तर सरकारने स्वतःची एक पंपनी स्थापन करून धारावीचा विकास करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवाय ‘टीडीआर’ बँक सरकारची करा, ‘अदानी’च्या हातात त्याच्या चाव्या कशासाठी देता, असा सवालही करण्यात आला आहे. तसेच ‘अदानी’चे भले करण्याच्या नादात आम्ही धारावीची जागा बळकावू देणार नाही, असा कडक इशाराही शिवसेनेने दिला आहे.

मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांना निवेदन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘अदानी’च्या ‘बीकेसी’तील कार्यालयावर प्रचंड मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे ‘धारावी बचाव आंदोलन’ मोर्चासाठी परवानगी द्यावी यासाठी माजी आमदार बाबूराव माने, विधानसभा संघटक विठ्ठल पवार यांच्या वतीने धारावी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्याकडे पत्र सादर करण्यात आले आहे.

धारावीकरांना 500 चौरस फुटांची जागा मिळालीच पाहिजे

धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन ही शिवसेनेची आग्रही मागणी असून या पुनर्विकासात धारावीकरांना 500 चौरस फुटांची जागा मिळणे हा त्यांचा अधिकारच असून त्यांना तो मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. पुनर्विकासाआधी या ठिकाणच्या 90 ते 95 हजार झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेचा तिढा सुटलाच पाहिजे, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

असा धडकणार मोर्चा

n शिवसेना व धारावी बचाव आंदोलकांकडून काढण्यात येणारा हा मोर्चा धारावी टी जंक्शन येथून निघणार असून ‘बीकेसी’, वांद्रे पूर्व येथील ‘अदानी’च्या कार्यालयावर धडकणार आहे.
n 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता निघणारा हा मोर्चा कलानगरमार्गे ‘बीकेसी’पर्यंत जाणार आहे. या मोर्चामध्ये शिवसेना पदाधिकाऱयांसह हजारो धारावीकर सहभागी होणार आहेत.
धारावीचा सर्वाधिक विकास बाळासाहेबांच्या काळात झाला आहे. अदानी विकास योजना नुकतीच आली आहे. ज्याचा व्यवसायावर निश्चितच विपरीत परिणाम होईल.
n मासूम अली शेख,

चामडय़ाचे व्यापारी

कपडय़ांचे सर्वाधिक काम मुंबईत कुठेही होत असेल तर ते धारावी आहे, अदानीच्या योजनेमुळे धारावीतील एक मोठा व्यवसाय उद्ध्वस्त होत आहे. – मोहम्मद फुल अन्सारी,
कपडय़ाचे व्यापारी
अदानीचा विकास काय आणि कसा आहे, हे येथे राहणाऱया लोकांना माहीत नाही, धारावी हे व्यापारासाठी ओळखले जाते. टेलरिंगपासून कापडय़ाच्या कामापर्यंत सर्व काही इतरत्र जाईल.
n मोहम्मद कासिम, हॉटेल व्यावसायिक

विधान भवनाच्या पायऱयांवर आंदोलन

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शिवसेना, काँग्रेसच्या आमदारांनी मोर्चा काढला. त्यानंतर विधान भवनाच्या पायऱयांवर धारावीच्या मुद्दय़ावर निदर्शने केली. शिवसेना गटनेते अजय चौधरी, रवींद्र वायकर, ऋतुजा लटके, राजन साळवी, वैभव नाईक, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यात सहभागी झाले.