मुंबईतील बोगस वकिलांवर पडणार धाड; बोरिवली, वांद्रे, किल्ला कोर्ट रडारवर; बार कौन्सिलचा निर्णय

>> अमर मोहिते

मुंबईतील बोगस वकिलांचा शोध घेण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा विशेष मोहीम हाती घेणार आहे. बोरिवली, वांद्रे आणि किल्ला कोर्टात बार कौन्सिलचे एक पथक अचानक धाड टाकून वकिलांची सर्व माहिती जाणून घेणार आहे. माहितीमध्ये चुकीचा तपशील आढळल्यास त्या वकिलावर कारवाई केली जाईल, अशी माहिती कौन्सिलचे माजी अध्यक्ष ऍड. विठ्ठल कोंडे-देशमुख यांनी दिली.

गेल्या आठवडय़ात न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणावर सुनावणी झाली. या सुनावणीत ऍड. राजेंद्र वर्मा हे याचिकाकर्त्याकडून युक्तिवाद करणार होते. त्या वेळी न्यायालयाने वर्मा यांना काही प्रश्न विचारले, तुम्ही कुठून सनद घेतली? तुम्ही कोणत्या बार कौन्सिलचे सदस्य आहात? तेव्हा वर्मा म्हणाले, मी बार कौन्सिलचा सदस्य आहे. मी माझा तपशील याचिकेत दिला आहे. पण त्यावर न्यायालयाचे समाधान झाले नाही.

ऍड. वर्मा हे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे सदस्य आहेत की नाहीत याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने  दिले. वर्मा हे बार कौन्सिल सदस्य नाहीत, अशी माहिती ऍड. कोंडे-देशमुख यांनी बुधवारी न्यायालयाला दिली. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आम्ही ऍड. वर्मा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश देऊ, असे स्पष्ट केले. या सुनावणीनंतर ऍड. कोंडे-देशमुख यांनी वरील माहिती दिली.

एकूण अडीच लाख तर मुंबईत 35 हजार वकिलांची नोंदणी

महाराष्ट्र, गोवा, दिव, दमण येथून बार कौन्सिलकडे जवळपास अडीच लाख वकिलांची नोंदणी आहे. मुंबईतून 35 हजार वकिलांची नोंदणी कौन्सिलकडे आहे. मात्र काही वकील हे कौन्सिलकडे नोंदणी नसताना वकिली करतात. वकील असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करतात. ही गंभीर बाब आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी कौन्सिल विशेष मोहीम हाती घेणार आहे. बोगस वकील शोधण्यासाठी कौन्सिल एक पथक नेमणार आहे. हे पथक बोरिवली, वांद्रे व किल्ला कोर्टाला अचानक भेट देईल. तेथील वकिलांकडून त्यांची संपूर्ण माहिती घेतली जाईल. माहितीमध्ये कोणता तपशील चुकीचा आढळल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ऍड. कोंडे-देशमुख यांनी सांगितले.