उन्हाच्या झळा वाढल्या, चारापाण्यासाठी वन्यप्राण्यांची तगमग

खळखळणारे नदी-नाले…पाण्याने तुडुंब भरलेले डोह…झुळझुळ वाहणारे नद्यांचे प्रवाह…किलबिल करणारे पक्षी… वनांमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार…असे दृश्य आज रानावनात पाहायला मिळत नाही. कारण, निसर्गातील ‘जीवन’ म्हणून ओळखला जाणारा अत्यंत महत्त्वाचा ‘पाणी’ व ‘चारा’ नावाचा घटक संपत आल्याने जंगलात पाणी व चाऱयासाठी जणूकाही ‘टाळेबंदी’ सुरू असल्याचे चित्र अनुभवास येत आहे. पाण्यासाठी वन्यजीव नागरी वस्त्यांकडे कूच करीत आहेत.

चैत्र महिना येत आहे. वैशाखापूर्वीच सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे. निसर्गातील नदी, नाले, जलस्रोत आटत आहेत. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. पाणवठय़ाअभावी वन्यजीवांमध्ये ‘लॉकडाऊन’ सुरू असल्याचे चित्र आहे. पाणी मिळेल, या आशेने वन्यप्राणी नागरी वस्त्यांच्या दिशेने कूच करीत आहेत. त्यात काही हिंस्र प्राण्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱया काळात मानव व वन्यप्राण्यांतील संघर्ष उद्भवू शकतो.

हे वन्यप्राणी गावाकडे येऊ नयेत, यासाठी वनांत पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तहानेने व्याकूळ वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. उन्हामुळे नदीनाल्यांसह जमिनीतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी व पक्षी शेतशिवाराकडे येत आहेत. शेतात असलेले रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसानसुद्धा करीत आहेत. प्राणी व पक्षी गावालगतच्या नदी-तलावांवर पाणी पिण्यासाठी येतात.

राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांच्या चहूबाजूच्या जंगलात गवे, सांबर, भेकर, बिबटे, काळवीट, मोर, लांडोर, ससे, रानडुक्कर, माकड, वानर व इतर जंगली प्राणी आहेत. वन विभागाने या वन्यप्राण्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे.

गव्यांचे लक्षणीय दर्शन

जंगलक्षेत्रात वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे, तर वणव्यांसारख्या प्रकारांनी वन्यप्राण्यांच्या सुरक्षित अधिवासावर परिणाम झाला आहे. कधीकाळी नदीभागात दुर्मिळपणे दृष्टीस पडणाऱया या प्राण्यांचा सध्या अधिक वावर वाढला आहे. यापैकी गव्यांचे कळपच्या कळप शेतशिवारांत ठाण मांडत असल्याने लोकांची चिंता वाढली आहे.

गतवर्षीपेक्षा चालू वर्षात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे जंगलातील ओढय़ा-नाल्यांना मार्चपर्यंत वाहणारे पाणी आता डिसेंबर-जानेवारीमध्येच संपले आहे. वन विभागामार्फत श्रमदानातून तयार केलेले वनराई बंधारेदेखील जवळपास कोरडे पडले आहेत. सध्या वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून राधानगरी वनपरीक्षेत्रात वनतळे मारण्याचे काम सुरू आहे. वन्यप्राण्यांच्या चारा आणि पाण्याची टंचाई भासण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे गैरसमजातून लावलेला वन वणवा. वणव्यामुळेदेखील ओढे, नाले, झरे कोरडे पडत आहेत. वणव्यामुळे जंगलातील चारा, लहान रोपे, वेली, झुडपे जळून खाक होतात परिणामी वन्यप्राण्यांना मिळणारा चारा नष्ट होऊन उपलब्ध असणारे पाणीदेखील आटून जात आहे. वणव्यामुळे पुढील वर्षी गवत चांगले येते हा गैरसमज ग्रामस्थांनी काढून टाकून आपले जंगल वणव्यापासून रोखून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून सहकार्य करा.

– विश्वास पाटील, परिमंडळ वन अधिकारी, म्हासुर्ली, ता. राधानगरी.

वन विभागाने त्वरित पाणवठे तयार करावेत

दरवर्षी वन विभागाकडून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जंगलात वन्यप्राण्यांकरिता कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. गतवर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. तरी वन विभागाने त्वरित ‘ऍक्शन मोड’मध्ये येऊन कृत्रिम पाणवठे तयार करावेत. वन्यप्राण्यांसह पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी.

– नारायण पारखे, चौके, ता. राधानगरी