शिवमंदिरांच्या राज्यात – वैजनाथची वरसई आणि सिद्धेश्वराचे गुळसुंदे

>>नीती मेहेंदळे

रायगड जिल्ह्यात पेणजवळचं वरसई गाव. पेण-खोपोली रस्त्यात लागणारं अगदी लहान खेडं. इथल्या निसर्गाच्या कुशीत विसावलेलं वैजनाथ शिवमंदिर देखणं आणि अप्रतिम. ‘पायऱया चढून वर आलं की, समोर दिंडी दरवाजासारखं वाकून प्रवेश करायला लावणारं नम्र द्वार. आत आपण येतो ते थेट सभामंडपातून गाभाऱयाकडे जायच्या मधल्या अंतराळात. गाभाऱयाच्या बाहेर पेशवाईनंतरच्या काळात आढळणाऱया पांढऱया रंगात बनवलेल्या मूर्ती देवकोष्ठांत दिसतात. पायऱया उतरून आत शिवपिंड गाभारा व्यापून दिसते. अंतराळाला तीन दरवाजे आहेत तीन दिशांना. पश्चिमेकडून आपण देवळात आलो आणि दक्षिणेस मुख्य दरवाजा. पूर्वेच्या बाजूने देवळाबाहेर आलं की, ती बाळगंगा नदी आणि तिथे एक नजर खिळवून टाकणारं दृश्य दिसतं. एका दगडावर एक चित्रकार रेलून बसलेला आहे आणि त्याच्या समोर बाळगंगा नदीचं खडकाळ पात्र आहे. नदी कसली ती! तहानलेला अवखळ ओढाच तो. त्याच्या शेजारच्या झाडाखाली सावलीत एक पुरातन नंदी विसावलेला आहे. मागे पाठीशी शिवमंदिराची भक्कम पाठराखण आहे.’ हे सुंदर वर्णन वरसईच्या वैजनाथ शिवमंदिराचं आहे.

देवळासमोर नदीच्या खूप मागे जंगलासारखा भाग दिसतो. त्याही मागे दूर डोंगराची खूण दिसते. त्या दिशेला माणिकगड आणि थोडं अलीकडच्या बाजूस सांकशीचा किल्ला दिसतो. यांच्या तटबंद्या शाबूत नसल्याने आधी पाहून आलेला माणूस केवळ अंदाजाने हे दुर्ग आहेत हे सांगू शकतो. नदीच्या दक्षिणेला रत्नदुर्ग किल्ला दिसतो. पावसाच्या एका सरीनेही एरवी दमट घामट धुळकट झालेले हे चार-पाच किल्ले आणि डोंगर स्वच्छ तरतरीत होऊन उठावलेले दिसू लागतात. असं दुर्गसान्निध्य लाभलेल्या या शिवमंदिराच्या पायऱया चढताना डाव्या बाजूस देवळापासून थोडय़ा अंतरावर एक रिकामा खोल तलाव असावा इतका पद्धतशीर खोदून काढलेला भव्य खड्डा आहे. आत पायऱया पण आहेत. म्हणजे तो घाट असावा. नक्कीच पूर्वी तो तलाव असावा. हे वरसई म्हणजे गोडसे भटजींचं गाव. मराठीतलं पहिलं प्रवासवर्णन गोडसे भटजी वरसईकर यांनी लिहिलं ते एकोणिसाव्या शतकात, ‘माझा प्रवास’ या नावाचं. त्याव्यतिरिक्त मेहेंदळे आडनाव धारण करणारी बरीच कुळंही याच गावातली आहेत.

वरसई गाठायचं झालं तर पेणमधून जावं लागतं.भोगावती नदीकिनारी पेण वसलेलं आहे. खुद्द पेण गावात विश्वेश्वर, रामेश्वर, हरिहरेश्वर, पाटणेश्वर, व्याघ्रेश्वर, केरेश्वर, गोठेश्वर इ. शिवमंदिरांचा वारसा पाय रोवून आहे. पेणमधून बाहेर पडलं की, निसर्ग अगदी उन्हाळ्यातसुद्धा हिरवाजर्द असतो. वरसईला जाताना दाट म्हणावं असं अरण्य लागतं. अशा निसर्गरम्य वरसईला शेजार लाभलेली दोन गावं म्हणजे गागोदे आणि शिरवली. शिरवली हे अजून एका पुरातन शिवमंदिराचं गाव आणि गागोदे म्हणजे आपल्या लाडक्या भारतरत्न महर्षी विनोबा भावेंचं गाव. इतक्या दुर्गम ठिकाणी महाराष्ट्राचं हे भूषण जन्माला आलं याचा गावकऱयांना नितांत अभिमान वाटतो. ते भूदान चळवळीचे प्रणेते होते हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यांचं नाव असलेला आश्रमही गावात आहे.

वरसईहून नदीचा रस्ता धरला तर मागे मागे जात आपटा या गावी एक अजून वारसा सांगणारं शिवमंदिर सापडतं. पेणहून राष्ट्रीय महामार्गावर आपटा फाटा. हे अजून एक लहानसं गाव. या गावात मात्र त्याव्यतिरिक्तही चिकार जुन्या मंदिरांचे बांधकामांचे अवशेष सापडतात. विशेषत: शिवमंदिरातल्या लाकडी खांबांवरची कलाकुसर लक्षवेधी आहे. वरच्या लाकडी तुळयांवरही कोरीव काम केलेलं आहे. नंदीसाठी स्वतंत्र नंदी मंडप हे पेशवेकालीन मंदिराच्या लक्षणांपैकी एक लक्षण. या कालखंडात घडवलेले नंदीही मोठे व आकर्षक झूल वगैरे असलेले दिसतात. मंदिराची बाहेरच्या बाजूस बरीच पडझड झाली होती, पण गावकऱयांनी पुढाकाराने भक्कम पत्र्याचं छत करून घेतलेलं दिसतं.

जवळच गुळसुंदे गावातही एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराची स्थिती मात्र उत्तम आहे. अंतराळावरचं वितान (छत) अतिभव्य व पाकार आहे. गाभाऱयात शिरताना द्वारशाखा समृद्ध कारकीर्दीचं दर्शन घडवते. शेजारीच देवकोष्ठांतल्या मूर्ती आपली नजर खिळवून ठेवतात.अगदी ललाटपट्टीवरील गणपतीसुद्धा देखणा कोरला आहे. भिंतींच्या वरच्या पट्टीत युद्धप्रसंग कोरले आहेत. एकंदर गणपती अधिक संख्येने असल्याने मंदिर पेशवेकालीन असण्याची शक्यता जास्त वाटते. तसेच बांधकाम आजही चांगलेच मजबूत आहे. वरसई, आपटा काय किंवा गुळसुंदे काय, रायगड जिह्याचे गुणधर्म बरोबर बाळगणारी गावं. एकदम सिंधुदुर्गप्रमाणे लाल मातीचा जायका नाही की रत्नागिरीचा डोंगराळ राकट लालसर जाक नाही की ठाण्याचा उजाड मुरुमी प्रदेश नाही की मुंबईची दमट वा किंवा शहरी छाप नाही. कोकणात शिरलोय याची वर्दी देणारा भाबडा जिल्हा. मोजक्या प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे ते गुळसुंदेचं. पेण नाक्याच्या गावाजवळचं. अगदी राष्ट्रीय महामार्गावरच असलेलं. जाता जाता डोकावता येण्यासारखी ही मंदिरं मुद्दाम पाहावीत. वारसा पहावा, जपावा आणि इतरांना सांगावा. वसा दिल्यासारखा!

[email protected]