झीनत अमान… बॉलिवूडला ‘बोल्ड’ करणारी हिरोईन!

>> प्रिया भोसले

तिला अभिनय फार काही चांगला जमायचा नाही. संवादफेकही यथातथाच होती. ती फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी हेमा,रेखा, शर्मिला टैगोर,राखी,आशा पारेख सारख्या अस्सल भारतिय चेहऱ्याच्या अभिनेत्रींचा दबदबा होता. अशात हलचल आणि हंगामासारख्या फ्लॉप सिनेमा दिल्यानंतर पहीला मोठा ब्रेक मिळाला देव आनंदच्या हरे रामा हरे कृष्णा सिनेमात. रोल मिळाला तो हि बहिणीचा. एकदा का बहिणीच्या रोलचा ठप्पा बसला तर पुढे हिरोईन म्हणून करीयर घडणं अशक्य होतं. पण तिच्या बाबतीत फिल्म इंडस्ट्रीने आपला नियम बदलला. हरे रामा हरे कृष्णासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसचा फिल्मफेअरचा अवॉर्ड देऊन तिच्यासाठी भावी हिरोईनच्या करीयरच्या वाटा खुल्या केल्या. ती हिरोईन होती झीनत अमान!

फिल्म इंडस्ट्रीने तिच्यातलं पोटोन्शियल ओळखलं होतं.बहिणीचा रोल करूनही झीनतला तिच्या ग्लॅमरस लूकमुळे पुढे सगळ्या भूमिका हिरोईनच्याच मिळत गेल्या.कायम स्वत:वर प्रेम करणारा देव आनंद तर तिच्या आकंठ प्रेमात होता.त्या प्रेमापोटी पुढचे सारे पिक्चर्स त्याने तिच्या नावावर केले. हिरा पन्ना, वॉरंट, प्रेमशास्त्र, ईश्क ईश्क ईश्क. पण झीनत तेव्हापासूनच पक्की प्रोफशनल होती आणि हुशार ही. आपलं अभिनयातलं नाणं खणखणीत वाजणार नाही हे सत्य स्वीकारून तिने प्रेक्षकांना तिची पर्सनॅलिटी, फिगर आणि रुप ह्यावर लक्ष केंद्रीत करायला लावलं.

1974 ला आलेल्या शम्मी कपूरच्या मनोरंजन आणि देवचा हिरा पन्ना ह्याचं उत्तम उदाहरण. दोन्ही सिनेमातून आपल्याला शरीर प्रदर्शनाचं अजिबात वावडं नाही तिने दाखवून दिलं. इतका बोल्ड अंदाज त्या काळी खलनायिका ही दाखवत नव्हत्या. पण झीनत कायम काळाच्या पुढे राहीली. सलमानने मैने प्यार कियाच्या प्रीमियरला तिला बोलावलं आणि सिनेमा कसा वाटला प्रश्न विचारून हात दाखवून अवलक्षण केलं होतं. डोळे बंद करुन हिरो, हिरोईनच्या पायाला औषध लावतो सारखा सीन निहायत ही बचकाना आहे असं म्हणून तिने त्याचं तोंड बंद केलं होतं.

साहजिकच आहे सत्तरच्या दशकात जिने बिनधास्त चुंबनदृष्य दिली होती, तिला तो सीन कसा पचनी पडणार होता.
करियरच्या सुरुवातीलाच झीनतने हरे रामा हरे कृष्णानंतर मनोरंजनमधे बोल्ड दृष्ये देण्याचं धाडस दाखवलं. असं जरी असलं तरी खरया अर्थाने राज कपूरच्या सत्यम शिवम् सुंदरम् मुळे तिच्या बोल्डनेसवर शिक्कामोर्तब झालं. राज कपूरचा सत्यम शिवम् सुंदरम् साठी हेमा मालिनी,डिंपल आणि विद्या सिन्हाचा चॉईस होता. अंगप्रदर्शाच्या अटीमुळे तिघींनीही नकार दिला आणि झीनतने मात्र तो जाणीवपूर्वक मिळवला.

सिनेमातलं झीनतचं अंगप्रदर्शन बघून त्या तिघींना तो रोल कसा काय झेपला असता प्रश्न पडतो. सत्यम शिवम सुंदरम् वर प्रचंड टिका झाली.पण तिला फरक पडत नव्हता. सेक्स सिम्बॉलचा टॅग तिने मनापासून स्वीकारला. झीनतने आपण उत्तम अभिनेत्री असल्याचा कधीच दावा केला नाही. ती कसर तिच्या देखणेपणाने सिनेमाची प्रत्येक फ्रेम उजळून सुंदर केली. उत्तम अभिनय जरी नाही केला तरी काही पिक्चर्समध्ये उत्तम मोजकेच सीन्स केले.

उदारणार्थ, रोटी कपडा और मकानमधला क्लायमॅक्स सीन बघा. त्याला मदत करताना तिला पोलिसांची गोळी लागते. दुष्टांचा नायनाट करण्यासाठी जाणाऱ्या मनोजकडे, मरणाच्या दारात असलेली, गोळी लागलेल्या वेदनेत ही, निरोपाचं इतकं गोड हसते. तो नजरेआड होईपर्यत ती त्याला डोळाभरून बघते, दृष्टिआड झाल्यावर मात्र पुन्हा तो आपल्याला कधीच दिसणार नाही म्हणून झीनतचं काळीज पिळवटल्यासारखं रडणं बघून बघणाऱ्याला हुंदका फुटतो.

तर सत्यम शिवम् सुंदरम् मधला ही क्लायमॅक्स सीन हि तसाच.पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आख्खं गाव दुसरीकडे निघालयं.ती गाणं गातेय. तर चेहरा नीट न पाहता आवाजावरुन सौंदर्यवती ठरवून टाकलेल्या प्रेयसीला शोधण्यासाठी आलेला शशी तिला डावलून रुपा रुपा साद घालत पुढे निघून जातो. ती पुन्हा गाऊ लागते. आवाज ऐकून तो समोर येतो आणि आपली प्रेयसी, बायको एकच असल्याचा साक्षात्कार त्याला होतो. त्याच्या चेहऱ्यावरचे अपराधी भाव बघून ‘राधा मोहन शरणम्’ म्हणत माफ केल्याचं बायकोछाप समजूतदार हसते, तेव्हा ती जगातली ग्रेट बायको वाटते.
सत्यम शिवम् सुंदरम् साठी तिला फिल्मफेअरचं पहिलं बेस्ट अॅक्टरचं नॉमिनेशन मिळालं. त्यानंतर दुसरं इन्साफ का तराजूसाठी.

बलात्कारासारख्या सामाजिक विषयावर आधारित इन्साफ का तराजूसाठी बी आर चोप्रांची पहिली पसंती किम होती. तिने नकार दिल्यावर ती भूमिका झीनतच्या वाट्याला आली. ह्या सिनेमातून झीनत अभिनय ही करू शकते याची झलक दिसली. पण तिची सेक्स सिम्बॉल इमेज लोकांनी इतकी स्वीकारली होती की तिच्याकडून उत्तम अभिनयाची कुणी अपेक्षा केली नाही.

झीनतचे बरेच सोलो हिरोईन असलेले पिक्चर्स हिट झालेत. त्यात तिला हिरोइतकं महत्व प्राप्त व्हायचंच. पण मल्टीस्टारर सिनेमा असेल तरी त्यातही स्वतःची वेगळी छाप पाडता यायची. अलिबाबा और चालीस चोर बघा, हम किसीसे कम नही, द ग्रेट गँम्बलर, पूकार बघा. अभिनय ठिकठाक करून ही दुसरया हिरोईनचं महत्त्व कमी करून टाकणं बऱ्यापैकी जमायचं तिला. तिची पर्सनॅलिटी, फिगर आणि सौंदर्य इतर हिरोईन्सवर ओव्हरपावर करत. अलीबाबा और चालीस चोरमध्ये धर्मेंद्रची हिरोईन, लीड रोल असूनही हेमा जितकी झळाळली नाही तितकी झीनत झळाळलीय. खतूबा गाणं बघा मोजक्याच डान्सस्टेप्सवर काय भारी नाचलीये आणि अप्सरेसारखी दिसलीय. सारे शहर में गाण्यात चक्क क्लासिकल डान्सर हेमासमोर आत्मविश्वासाने नाचलीय. बरं हेमापेक्षा ती एक आणा कमी वाटत नाही हे विशेष. त्यात तिचं सेन्शुअस दिसणं तर बोनसच! हेमासारखं पूकारमध्ये हि तिने टिनाला सहज झाकोळून टाकलं. ‘समंदर में नहा के’ पाहीलय, ते एक गाणं केलं असतं आणि बाकी काही केलं नसतं तरी चालून गेलं असतं इतकी ती त्यात उफ्फ् टाईप दिसलीय.

फक्त तेव्हाच नाही, ती आजही तशीच हावी होणारी झीनत आहे. सोशल मीडियावर जुने कलाकार हार्डली अॅक्टिव्ह असताना झीनीबेबी इन्स्टाग्रामवर धडाकेबाज लिखाणातून लोकांना इंप्रेस करतेय. जो इन्स्टाग्राम फक्त फोटोसाठी वापरला जातो तिथे ती प्रत्येक फोटोची कहाणी शेयर करत वाहवाही लुटतेय.

लाखो लोकांच्या ह्रदयाची धडकन असणारी झीनत प्रेमाबाबतीत फारशी भाग्यवान ठरली नाही.पण त्याचा मागमूसही दिसणार नाही इतकं ग्रेसफुली ती जगत आलीय. पुढे ही वयाला ग्रेसफुली स्वीकारुन जगणार ह्यात शंका नाही
ह्या पृथ्वीतलावर तुम्ही किती वर्ष आहात सांगणारा पुरावा तुमचं वय असतं. पण तुम्ही कसे जगलात हे सांगणारा पुरावा तुमचं कर्तृत्व दाखवतं. हेच अधोरेखित करत, प्रदीर्घ कालावधीनंतर झीनत पुन्हा एकदा मागच्या कारकीर्दीचा आलेख मांडत लोकांच्या चर्चेचा विषय होण्यात यशस्वी होतेय.

19 नोव्हेंबरला ती 72 वर्षाची होईल. मुरलेली वाईन, मुरलेलं लोणचं जसं बहारदार चव देतात, झीनतही असंच बहारदार रसायन होत राहणार. अगदी उद्या हे रसायन 100 वर्षाचं जरी झालं तर तेव्हाही आपण झीनत अमानसाठी हेच म्हणू
Age is just a number!