लेखाजोखा 2023 – भारतीय शेअर बाजार, एक पाऊल पुढे

>> अॅड. कौस्तुभ खोरवाल

शेअर बाजारातील विक्रमी तेजीचा स्तर राखून वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये हाँगकाँग शेअर बाजाराला मागे सारून भारतीय शेअर बाजार जगातील सातव्या क्रमांकाचा शेअर बाजार झाला आहे. या गुंतवणुकीबाबत उत्साहवर्धक वातावरणात आपण शेअर बाजाराकडे कसे पाहावे, कुठल्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यावेत याबाबत अधिक स्पष्टतादेखील गरजेची आहे. भारतीय शेअर बाजारातील वार्षिक घडामोडींचा आढावा घेताना या प्रश्नांच्या उत्तरांचादेखील उलगडा होईल.

शेअर बाजार हे वाक्य उच्चारले तरी ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ या दोन प्रमुख निर्देशांकातील वाढ डोळ्यांसमोर येते. वर्षभरात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता म्युच्युअल फंड योजनांना मिळणारा प्रतिसाद हिंदुस्थानी गुंतवणूकदारांची ‘तिसरी महाशक्ती’ दाखवून देत आहे. असोसिएशन  ऑफ म्युच्युअल फंड इंडियाने (एएमएफआय) जाहीर केलेल्या माहितीनुसार, देशात प्रथमच एक महिन्यात सतरा हजार कोटीहून अधिक गुंतवणूक म्युच्युअल फंड योजनांद्वारे झाली आहे. म्युच्युअल फंडमधील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी)  नोव्हेंबर 2023 मधील गुंतवणूक रु.17,073 कोटींवर पोहोचली आहे. या सकारात्मक गुंतवणूक वातावरणाला बळ देण्यासाठी सेबीकडून एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये होणाऱ्या दरमहा गुंतवणुकीची किमान मर्यादा 250 रुपये करण्याची इच्छा दर्शविली जात आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांची गुंतवणूक इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये होईल.

निफ्टीने 21 हजारांचा स्तर गाठला  

निफ्टीने 11 सप्टेंबर 2023 रोजी 20 हजारांचा स्तर गाठला होता. त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांत म्हणजे  12 डिसेंबर 2023 रोजी निफ्टीने 21 हजारांचा आकडा  पार केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर ाtढड

ऑइलचे सतत वाढणारे भाव आणि अमेरिकन 

डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण हे दोन मुख्य चिंताजनक धोके बाजूला सारत निफ्टीने याच वर्षी 21 हजारांचा आकडा स्वबळावर पार केला. म्हणजेच हिंदुस्थानी गुंतवणूकदारांच्या वाढत असणाऱ्या शेअर्समधील गुंतवणूक प्रमाणामुळे राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकाने नवीन उच्चांक स्तर प्रस्थापित केला. निफ्टीमधील घोडदौड पुढेदेखील चालू राहण्याची भविष्यवाणी सर्व ब्रोकिंग कंपन्यांकडून होत आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये सहभागी होणाऱ्या टॉप पन्नास कंपन्यांमधील कुठल्याही कंपनीचे शेअर्स खंडाखंडाने घेत राहावे.

सामान्य गुंतवणूकदाराला खिशाला परवडणाऱ्या आणि भविष्यात भरपूर नफा देण्याची शक्यता असलेल्या टॉप पन्नास कंपन्यांमधील काही कंपन्यांची नावे नमूद करत आहोत.  एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, हिंडाल्को, टाटा स्टील, आयटीसी, एनटीपीसी, एल अँड टी, रिलायन्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि कोल इंडिया. या नमूद केलेल्या सर्व कंपन्यांच्या शेअर किमतीत सातत्याने नवीन उच्चांक स्तर दिसून येत आहेत. गुंतवणूकदारांनी किमान दोन-तीन वर्षांसाठी यामधील कुठल्याही एक-दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास निश्चितच फायदा दिसून येईल.

लिस्टेड सरकारी कंपन्या 

शेअर बाजारात लिस्टेड कंपनी म्हणजे शेअर खरेदी-पीसाठी उपलब्ध असणे. लिस्टेड सरकारी कंपन्यांची यादी खूप मोठी आहे, पण काही विशेष सरकारी कंपन्यांचा उल्लेख केल्यास आपल्याला सरकारी कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूक स्वरूपात विकत घेण्यास निश्चितच मदत होईल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी), नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम (आयआरसीटीसी), कोल इंडिया इत्यादी. या सर्व सरकारी कंपन्या स्वतच्या क्षेत्रात अव्वल दर्जाच्या आहेत.

सरकारी बँक 

सरकारी कंपनीबाबत अभ्यास (निरीक्षण) करताना बँकिंग क्षेत्राचा अभ्यास स्वतंत्रपणे करत राहणे गरजेचे आहे. कारण शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पीएसयू बँकांचा  समावेश आहे. त्याचप्रमाणे फ्युचर आणि  ऑप्शनमध्ये ट्रेड करणारे ‘बँक निफ्टी’कडे कधीच दुर्लक्ष करू शकत नाहीत. या ‘बँक निफ्टी’मध्येदेखील दिग्गज सरकारी (पीएसयू) बँकांचा समावेश आहे. लिस्टेड सरकारी बँक श्रेणीत येणाऱ्या बँकांची नावे नमूद करत आहोत. यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक  ऑफ इंडिया, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश होतो.

या सर्व लिस्टेड सरकारी बँकांची नावे नमूद करण्याचे अजून एक विशेष कारण आहे. रोज तुम्हाला यातील किमान एका बँकेबद्दलची चांगली बातमी विविध माध्यमांतून दिसत असते. म्हणजेच इतक्या सािढय बँक (कंपन्या) आपल्या डोळ्यांसमोर असताना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगळे मार्गदर्शन मिळण्याची गरज भासत नाही.

तेजीच्या काळात शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी विशेष मार्गदर्शन 

आपल्याकडे केवळ दहा हजार गुंतवणूक करण्यासाठी आहे असे गृहीत धरून  काही सरकारी कंपन्यांची नावे नमूद करत आहोत, जेणेकरून तुम्हाला सरकारी कंपन्यांचे शेअर विकत घेण्यास आर्थिक आणि मानसिक दबाव येणार नाही.

काही दिग्गज सरकारी कंपन्यांचा (प्रति) शेअर भाव 125 रुपयांहून कमी आहे. त्यामध्ये बीएचईएल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, नाल्को आणि स्टील अथारिटी ऑफ इंडिया आहेत.

काही दिग्गज सरकारी कंपन्यांचा (प्रति) शेअर भाव 100 रुपयांहून कमी आहे. त्यामध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमटीसी, एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि एनएचपीसी आहेत. वर्ष 2023 मध्ये नमूद केलेल्या बहुतांश सरकारी कंपन्यांच्या शेअर किमतीत कमालीची वाढ झाली आहे आणि येणाऱ्या काळातदेखील नमूद शेअर बाजारातील दुसरी बाजू म्हणजेच आर्थिक जोखीमदेखील नजरेआड करून चालणार नाही. कोरोना काळात हिंदुस्थानातील बहुतांश युवा पिढी शेअर बाजाराकडे रोज पैसे कमविण्याच्या साधनस्वरूपात पाहू लागली. त्याचा आर्थिक फटका फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेड (खरेदी-पी) करणाऱ्यांना अधिक बसला आहे. जनजागृती होण्याकरिता सेबीने 2023 मध्ये तोटा सहन करणाऱ्यांची आकडेवारी नमूद केली. त्या आकडेवारीनुसार 89 टक्के ट्रेडर्सनी सरासरी एक लाखाहून अधिक रुपये गमावले.

अनिश्चित परतावा देणाऱ्या शेअर्समधील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळण्याचे एकच सूत्र आहे…

दीर्घकाळ खंडाखंडाने पैशांची गुंतवणूक करणे. त्यामुळे शेअर बाजाराकडे  पाहताना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा राजमार्ग स्वरूपात पाहावे.

सध्या देशाची लोकसंख्या 144 करोड आहे. त्यातील 120 करोड लोक इंटरनेट सेवेचा वापर करत आहेत आणि 65 करोड लोकांकडे स्मार्टफोन आहे. आर्थिक साक्षरतेचे प्रमाण दर दिवसाला वाढत असल्यामुळे डीमॅट खातेदारांची संख्या 10 करोडपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे ही तर फक्त सुरुवात आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.

(लेखक प्राध्यापक आणि गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार आहेत)