ग्रंथयात्रा – गेयतेचं लेणं ल्यालेली कविता

>> अर्चना मिरजकर

‘गुलाब माझ्या हृदयी फुलला,
रंग तुझ्या गालांवर खुलला;
काटा माझ्या पायी रुतला,
शूल तुझ्या उरी कोमल का?’

ही लोभसवाणी कविता आहे भास्कर रामचंद्र तांबे या सुप्रसिद्ध कवींची. तांबेंचं बालपण मध्य प्रदेशातील देवास या गावी गेलं. पुढे ते शिक्षणासाठी इंदूरला गेले आणि नंतर देवास संस्थानच्या राजपुत्राचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. याच निमित्ताने त्यांनी रचलेलं बालगीत लोकप्रिय झालं…

‘चिवचिव चिमणी छतात छतात
आरसा लोंबे भिंतीला भिंतीला
चिमणी पाहे सवतीला सवतीला

तांबेंची कवी म्हणून खरी ओळख होते ती त्यांच्या भावस्पर्शी प्रेमकवितेतून. त्यांनी संस्कृत काव्याचा अभ्यास तर केला होताच, तसेच इंग्रजी रोमॅंटिक कवींच्या कवितादेखील वाचल्या होत्या. इंग्रजी कवितांतील प्रेमविषयक मोकळेपणा आणि हिंदुस्थानच्या संस्थानातील वातावरण यांच्या मिलाफातून तांब्यांची कविता फुलली. त्यांचे कल्पनासौंदर्य लेवून रसरशीत भावना व्यक्त करणारी बांधेसूद कविता आकाराला आली. ‘ती रम्या रजनी’, ‘सत्प्रीतीमार्ग’ अशा प्रेमसाफल्याच्या कवितांमधून ती व्यक्त झाली.

‘डोळे हे जुलमी गडे, रोखुनि मज पाहू नका’ किंवा ‘घट तिचा रिकामा’ अशी नाटय़मयता असलेलं गीतं असो वा
‘ते दूध तुझ्या त्या घटातले
का अधिक गोड लागे न कळे’
अशी मधुर भावना असो, त्यांच्या कवितांनी एक वेगळीच प्रतिमा सृष्टी निर्माण केली.
घट तिचा रिकामा झऱयावरी
त्या चुंबिती नाचुनी जळलहरी
अशी कशी ही जादू घडली
बघता बघता कशी हरपली?
अशी कुठे पाणी भरण्यास गेलेली आणि रिकामा घट तसाच ठेवून प्रियकराला भेटायला गेलेली युवती आपल्याला कधी भेटते.
तांबेंची कविता स्वभावतच गेयतेचं लेणं लेवून अवतरली. ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’ यांसारख्या कवितांची अवीट गोडीची भावगीतं तयार झाली. प्रेमसाफल्याची गीते गाता गाता तांबेंच्या काही कविता अनेक पदरी अर्थ लेवून आल्या.
‘नववधू प्रिया मी बावरते
लाजते, पुढे सरते, फिरते’
हे जितके एका लाजऱया वधूचे अंतरंग आहे, तितकेच ते एका शिवासाठी तळमळणाऱया जिवाचेही प्रतीक आहे असे या शेवटच्या कडव्यावरून वाटते…
अता तूच भयलाज हरी रे!
धीर देऊनी ने नवरी रे :
भरोत भरतील नेत्र जरी रे!
कळ पळभर मात्र! खरे घर ते!
प्रेमाव्यतिरिक्त तांबेंनी यापूर्वी कवितेत न आलेल्या विषयांवरही कविता केल्या.
‘निजल्या ताह्यावरी माऊली
दृष्टी सारखी धरी’
यात एका आईचे कौतुकमिश्रित वात्सल्य प्रकट होते.
‘कुरणावरती वडाखाली गाई वळत बैसतो
स्फटिकापरी निर्मळ हा खळखळ झरा जवळ वाहतो’
या ‘गुराख्याचे गाणे’ या कवितेत एक रम्य निसर्गचित्र ते रेखाटतात. तांबेंनी केशवसुतांहून निराळी, पण आधुनिक कवितेच्या विकासाला पूरक अशी सौंदर्यदृष्टी मराठी कवितेला दिली. आपल्या तृप्त, आनंदी वृत्तीत तल्लीन होऊन त्यांनी अतितरल भावावस्था आपल्या कवितांमधून प्रकट केल्या. त्यांच्या स्त्राrविषयीच्या कविता प्रचलित कवितेपेक्षा वेगळ्या आहेत…
‘भयचकित नमावे तुज रमणी,
जन कसे तुडविती तुज चरणी?’
असा स्त्राr जातीच्या सामर्थ्याविषयीचा विश्वास ते व्यक्त करतात. त्यांच्या कनवाळू दृष्टीला विधवांचे दुःख पाहवत नाही. ‘विधवेचे स्वप्न’, ‘विधवेचे मन’ यांसारख्या कवितांमधून त्यांची सहवेदना व्यक्त होते.
सर्व विश्वात एक उदात्त आणि आनंदमयी सौंदर्याची अनुभूती घेणाऱया, त्या संवेदनांनी प्रफुल्लित झालेली आपली वृत्ती लालित्यपूर्ण आणि नादमधुर गीतांतून मांडणाऱया तांबेंनी तत्त्वचिंतनात्मक कविताही विपुल प्रमाणात लिहिली.
‘घन तमी पा बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी!’
असा दुर्दम्य आशावाद त्यांच्या कवितेचा स्थायिभाव आहे.
आपल्या मृत्यूनंतर आप्तमित्र थोडे दिवस शोक करतील, पण पुन्हा सर्व काही नित्याप्रमाणे सुरू राहील याची त्यांना जाणीव आहे.
‘जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय?
अशा जगास्तव काय कुढावे
मोही कुणाच्या का गुंतावे?’
अशी त्यांच्या मनाची तयारी झालेली आहे.
मृत्यूच्या वास्तवाचा त्यांच्या मनाने समंजसपणाने स्वीकार केला आहे. त्याच्या विचाराने होणाऱया मनाच्या अवस्थांचे ते कवितेत चित्रण करतात.
‘कशी काळनागिणी वैरीण झाली नदी
प्राणविसावा पैलतीरावरी अफाट वाहे मधी’
या कवितेत तर मृत्यूनंतरच्या जगाविषयीची एक विलक्षण ओढ दिसून येते.
‘प्राणाचे घे मोल नाविका, लावी पार, ने अधी!’
अशी विनवणी ते करतात.
प्रेमाचे मूल्य जोपासणारी, सर्वच जगाकडे प्रेमळपणाने पाहणारी, सौंदर्याचा आस्वाद घेणारी आणि धीराने संकटांना सामोरी जाणारी तांबेंची मनोवृत्ती त्यांच्या कवितांमधून प्रकट होते. जीवनाविषयीची तृप्ती आणि समाधान त्यातून जाणवते. ही कविता तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे.

ब्लर्ब: भा. रा. तांबे यांच्या कवितेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पहा- भ्दल्ऊल्ंा/@उraहूप्ब्atra भाग 20. प्रोफेसर ललिता मिरजकर यांच्याकडून ऐका या कवितेचे साहित्यिक गुण.