प्लेलिस्ट – क्या मौसम है…

>> हर्षवर्धन दातार

आपल्या भावनिक भूतकाळाला वर्तमानकाळात शोधणे हा उपजत मानवी स्वभाव आहे. ‘दुसरा आदमी’ हा ‘गुड बाय अगेन’ या हॉलीवूड चित्रपटावर आधारित चित्रपट. कथेला भावनिक शिखरावर नेऊन पुन्हा वास्तविकतेच्या जमिनीवर आणणारे ‘क्या मौसम है’ हे या चित्रपटातील गीत जे चित्रपटाचा सारांश आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

नायक-नायिकेच्या दुहेरी भूमिका (अनेकदा परस्परविरोधी चारित्र्याच्या, स्वभावधर्माच्या) असलेले अनेक चित्रपट आपण पाहतो. एका भूमिकेचा मृत्यू होतो, पण मुख्य कलाकार दुसऱया भूमिकेच्या माध्यमातून कथा पुढे जाते. शत्रुघ्न सिन्हा (कालिचरण), रत्नदीप गिरीश कर्नाड), अमिताभ बच्चन (डॉन), जितेंद्र (दुल्हन), राजेश खन्ना-हेमा मालिनी (कुदरत), शाहरुख आणि सलमान (करण-अर्जुन) या पठडीतले काही चित्रपट. जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तिरेखेशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती भेटणे या स्वरूपाची कथा असलेले चित्रपटसुद्धा आहेत. आपल्या भावनिक भूतकाळाला वर्तमानकाळात शोधणे हा उपजत मानवी स्वभाव आहे. ‘दुसरा आदमी’ (1977) हा ‘गुड बाय अगेन’ (1961) या हॉलीवूड चित्रपटावर आधारित ( जो फ्रान्कोईस- उच्चार फ्रांसुआ- सेगनच्या मूळ ‘आईमेज -वू – ब्राह्मस’ या कादंबरीवर आधारित आहे) या साखळीतीलाच, पण एक वेगळीच हाताळणी देणारा चित्रपट. निशा (राखी) ही जाहिरात क्षेत्राशी संबंधित एक प्रौढ, मध्यमवयीन स्त्राr शशी सेहगल (शशी कपूर) या जोडीदाराच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे काहीशी एकलकोंडी आणि नैराश्यग्रस्त झालेली आहे. कामानिमित्त भेटलेल्या करण (ऋषी कपूर) या युवकात तिला भास होतो आपल्या दिवंगत जोडीदाराचा. तोच चेहरा, तेच हावभाव… करणच्या रूपाने निशाला तिचा भूतकाळ (शशी सेहगल) सापडला होता. निशा आणि करण या दोघांच्या भावनिक जवळिकीमुळे करण आणि टिमसी (नीतू सिंग) या जोडप्याच्या वैवाहिक जीवनात वादळ निर्माण होते. भीषम (परीक्षित साहनी) हा निशाच्या जीवनातील घटनांचा मूक साक्षीदार, हितचिंतक आणि अव्यक्त प्रियकर. शेवटी त्याच्या हस्तक्षेपामुळे निशा करणच्या आयुष्यातून दूर जाते आणि चित्रपट चाकोरीबद्ध शेवटाकडे वाटचाल करतो.

यश चोप्रांचे सहाय्यक रमेश तलवार यांचा दिग्दर्शक या नात्याने पहिला चित्रपट. नवोदित संगीतकार राजेश रोशन यांच्या सर्व चाली खूप चालल्या. लोकप्रिय गाण्याचे श्रेय अनेक दशकांच्या बदलत्या परिप्रेक्ष्याला साजेसे गीतलेखन करणाऱया पुरोगामी गीत आणि गजलकार मजरूह सुल्तानपुरींनाही. तरुणाईला साजेशी खोडकर, प्रणयरम्य गाणी आणि कथेला भावनिक शिखरावर नेऊन पुन्हा वास्तविकतेच्या जमिनीवर आणणारे ‘क्या मौसम है’ हे गीत. चित्रपटाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आलेल्या, किशोर कुमार, लताजी आणि रफीसाहेबांनी गायलेल्या या अतिशय श्रवणीय गाण्याचे आज अवलोकन. या गाण्यात चित्रपटाचा सारांश आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. मजरूह साहेबांनी आपल्या शब्दांत चित्रपटाचा गाभा उकलला आहे. यथोचित निसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन जिवंत भूमिका आणि एक आभास अशा एकत्रित भावनांचा कल्लोळ लताजी, किशोर कुमार आणि रफीसाहेबांनी आपल्या गायकीतून सार्थ केला आहे.

कामानिमित्त करण आणि निशा खंडाळ्याला जात असताना वाटेत त्यांची गाडी नादुरुस्त होते. सगळीकडे हिरवागार आणि धुक्याने वेढलेला परिसर. करण आणि निशा चालत असतात एका स्वप्नवत अवस्थेत. अशा पार्श्वभूमीवर आणि त्या वातावरणाला पोषक अशा इराणी संतूर आणि फ्लूटने गाण्याची सुरुवात होते…

क्या मौसम है, ऐ दीवाने दिल
अरे चल कही दूर निकल जाये

डबल बास ड्रम्स आणि तीव्र तारेतील व्हायोलिन्सच्या साथीने पार्श्वसंगीत गती पकडते. दिग्दर्शकाने फ्लॅशबॅकचा खुबीने वापर केला आहे. विचारात गढलेली निशा आपल्या भूतकाळात जाते. तिला दिसू लागतो शशी सेहगल (शशी कपूर). त्याचबरोबर इथे बदललेल्या संदर्भात रफीसाहेब आपल्या सलग आलाप आणि सुरांनी या संगीत सफरीत प्रवेश करतात. इथे ड्रम्स आणखी तीव्र होतात आणि पुढे भावनांच्या शिखरावर आल्यानंतर संगीत संथ होते. गाण्याच्या मध्यावर लय किंचित मंद होते. यावेळी व्हायोलिन्सचे सूर वातावरणाला एक उदास किनार प्रदान करतात आणि कथेला स्वाभाविक वळण मिळते.

संगीतकार राजेश रोशननी या गाण्यात वाद्यवृंद अतिशय कल्पकतेने वापरला आहे. योग्य ठिकाणी इराणी संतूर, बॉन्गो-काँगो अकोस्टिक गिटार, रेशो-रेशो, कीबोर्डचा वाद्यमेळ नेमका प्रभाव साधतात. विशेषत दुसऱया कडव्यात तीव्र स्वरातील व्हायोलिन्स, ड्रम आणि तार शेहनाई गाण्याच्या आवेगात एका उंचीवर नेतात. भावनांचा आवेग ओसरल्यावर गाणं पुन्हा एकदा संथ सुरात पुढे जातं. तरुणाईला साजेसं खोडकर ‘नजरो से कहदो’, प्रणयरम्य ‘आँखो में काजल है’, धुंद करणारे ‘आओ मनाये जश्ने मुहब्बत’. त्या काळात ही गाणी युवा पिढीची ध्येयगीते बनली आणि कथेला भावनिक शिखरावर नेऊन पुन्हा वास्तविकतेच्या जमिनीवर आणणारे ‘क्या मौसम है’ हे गीत हा मजरूह साहेबांच्या विविधतेचा करिष्मा.

दिवंगत पार्श्वगायक महंमद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ येत्या 24 डिसेंबरपासून होतो आहे. या गाण्यातील एक अतिशय महत्त्वपूर्ण तुकडा रफीसाहेबांनी शशी कपूरच्या भूमिकेला साजेसा अतिशय सुंदर गायला आहे. या गाण्याची रफीसाहेबांबाबत एक हृद्य आठवण स्वत संगीतकार राजेश रोशननी सांगितली आहे. गाण्याची चाल आणि त्यातील एक छोटासा भाग रफीसाहेबांनी गायचं ठरलं. मात्र त्यानंतर रफीसाहेब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. असे असूनही ध्वनिमुद्रणाच्या दिवशी ते सरळ स्टुडिओमध्ये आले आणि कोणत्याही सरावाशिवाय दहा taव मध्ये त्यांनी अंतरा गायला. तल्लख बुद्धी, स्मरणशक्ती आणि कलेशी बांधिलकी यांचा आदर्श नमुना.

जाता जाता : ऋषी कपूरच्या आग्रहामुळे यश चोप्रांचे सहाय्यक रमेश तलवारना दिग्दर्शनाची संधी मिळाली. निशाच्या भूमिकेसाठी आधी नियोजित शर्मिला टागोरऐवजी राखी गुलजारची निवड आणि दिग्दर्शक रमेश तलवारनी यश चोप्रांच्या पसंतीविरुद्ध बेतलेला चित्रपटाचा चाकोरीबद्ध शेवट या चित्रपटाशी संबंधित काही ठळक घडामोडी. शशी कपूर इतकी छोटी भूमिका करायला नाखूष होता. मात्र त्याचं आणि ऋषी कपूरमधील साम्य (काका-पुतण्या) या एका मुद्दय़ावर यश चोप्रांनी त्याचे मन वळविले. सिनेमात ऋषी कपूर आणि नीतू सिंग या गाजलेल्या जोडगोळीची केमिस्ट्री (स्वाभाविक कारणाकरिता) अफलातून आहे. 1978च्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या यादीत राखीला सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. एक विवाहित तरुण युवक आणि त्याच्यापेक्षा वयाने बरीच मोठी असलेली स्त्राr यांच्यातील भावनिक संबंध आणि जवळीक दाखवणारे कथासूत्र कालपरत्वे काहीसे पुढे (aप् द tग्से) असल्यामुळे चित्रपट लोकप्रियतेच्या निकषावर फार चालला नाही. कदाचित आजच्या बदलत्या काळात स्वीकारार्ह होईल. याच विषयावर 2001 मध्ये ‘दिल ने फिर याद किया’ हा चित्रपट आला होता.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)